राजेंद्र पाटील राऊत
ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रक एसटी बसला धडकला; १४ प्रवाशी जखमी, मोताळा-बुलडाणा रोडवरील घटना –
ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या ट्रकने एसटी बसला जबर धडक दिली. या धडकेत बसमधील १४ प्रवासी जखमी झाले तर धडक देणारा ट्रक उलटला. ही घटना आज, १९ सप्टेंबर राेजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मोताळा- बुलडाणा रोडवरील मोहेगाव फाट्याजवळ घडली.
जळगाव जामोद आगाराची सोनाळा ते बुलडाणा बस (क्र. एमएच ४० -४०५७) घेऊन चालक दीपक गणपत राजनकर व वाहक एम. पी. चंदलकर बुलडाण्याकडे येत होते. बसमध्ये ५० प्रवाशी होते. मोहेगाव फाट्याजवळ बुलडाण्याकडून येणाऱ्या ट्रकने (क्रम. एमएच ०९,एच एच ५५५०) ने दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात बसला धडक दिली. यात बसच्या चालकाकडील मागील बाजूचा भाग चिरला गेला. अपघातानंतर ट्रक उलटला. हा ट्रक अक्कलकोटवरून इंदौरकडे मूग घेऊन जात होता. ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.
या अपघातात १४ प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसचालक आणि वाहक बोराखेडी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. अपघातातील जखमी किसन तुकाराम सोनोने (५५, रा. सावरगाव, ता. जळगाव जामोद ) यांनी सांगितले, की किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. उपचारासाठी ते बुलडाणा येथे होते. उखाजी भोपळे (८५, रा. दहेगाव मातोंडा) हे व त्यांच्यासोबत ३ ते ४ बुलडाणा येथे कबीर पंथाच्या सत्संगासाठी येत होते. पवन राजू सुकलकर (२७) व त्यांची आजी कौसल्याबाई सुकलकर (७०, दोघे रा. जळगाव जामोद) हे पवनसाठी मुलगी पाहण्याकरिता औरंगाबाद येथे जात होते. मात्र अपघातात पवनचा पाय मोडल्याने त्याला दवाखान्यात भरती व्हावे लागले. अपघाताचा तपास बोराखेडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल भुसारी, पोहेकाँ सुनील थोरात, जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीचे नरेंद्र रोटे करीत आहेत.
अपघातातील इतर जखमींची नावे
आदित्य रवींद्र गारमोडे(१७, रा. नांदुरा)
शेख रशीद शेख मुसा(६५,रा बुलडाणा)
ज्ञानदेव भिकाजी नरवाडे (७०) व त्यांची पत्नी सुमनबाई ज्ञानदेव नरवाडे(६५, रा. मेंदळी, ता. नांदुरा)
मंगला किसन सोनुने (४६, सावरगाव, ता. जळगाव जामोद)
उषा अशोक खर्चे (५०, रा. शेंबा, ता. नांदुरा)
कुसुम मुरलीधर इंगळे (६२, रा. बोराखेडी)
कमल विजय बाठे (५८, रा. निमगाव ता. नांदुरा)
सोफिया सय्यद युनूस (२५, रा. बोराखेडी, ता. मोताळा)
कस्तुराबाई शेषराव गारमोडे (८०, रा. नांदुरा)