राजेंद्र पाटील राऊत
कोल्हापूर शहरात आढळले तिन रानटी गवे
कोल्हापूर शहरात लक्षतीर्थ वसाहत आणि सुतारमळा परिसरात काल सांयकाळी आयडियल कॉलनीजवळ गव्यांचा मोकाट वावर दिसत असल्याने शहरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागासह अग्निशमन दलाने परिसरात शोध मोहीम सुरू केली. गवे उत्तरेश्वर पेठमार्गे शहरात येणार नाही, या दृष्टीने वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तरेश्वर पेठेतील गवत मंडई ते शिंगणापूरकडे जाणार्या रस्त्यावर गव्यांचा कळप आज सायंकाळी काहींना दिसला. परिसरातील नागरिक बाळकृष्ण मोरे यांनी ही माहिती वन विभागाला दिली. यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
शहरात घुसलेले ३ गवे मध्यम वाढ झालेले आहेत. पूर्ण वाढीचा नर आणि दोन माद्या असा गव्यांचा कळप असल्याचे वन विभागाने सांगितले. हा कळप पन्हाळ्यावरून आल्याची शक्यता व्यक्त केली आहे. कळपातील दोन गवे सुतार मळ्याकडे जाणार्या रस्त्यावरून पंचगंगा नदीच्या दिशेने तर एक गवा दुधाळीच्या दिशेने गेला.
कळपातून वेगळा झालेला गवा भेदरून शहरात शिरणार नाही, यासाठी वन विभागाने तीन पथके केली. हा गवा शहरात येणार नाही यादृष्टीने गस्त सुरू करण्यात आली. उर्वरित दोन गव्यांचाही एका पथकाकडून शोध सुरू करण्यात आला आहे. पंचगंगा घाट परिसरातही एक पथक तैनात ठेवले आहे. दरम्यान, गवे शहरात आल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे शिंगणापूरकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे.
दरम्यान, शहरातील लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा परिसरातील आयडियल कॉलनी येथे गव्यांचा मुक्त वावर सुरू असलेला व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये ३ गवे स्पष्टपणे दिसत होते. हा कळप दोन दिवसांपासून या परिसरात फिरत असल्याचे काहींनी सांगितले तर काहींच्या म्हणण्यानुसार आज सायंकाळनंतर गव्यांचे दर्शन झाले आहे.
शहरात यापूर्वीही अनेकदा गवे शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. रंकाळा, सुतारमळा, जयंती नाला या परिसरात गेल्या पाच वर्षांत तीन वेळा गव्यांचे दर्शन घडले आहे. सर्व पार्श्वभूमीवर वन विभागाने सुतारमळा परिसरातील या गव्यांना पुन्हा जंगलात परत पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .