. . . कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन !
⏺राजेंद्र पाटील राऊत पत्रकार
🔲 तेव्हाचं जीवन कसं शांत, तरल आणि निश्चितीचं होतं. उगवणारा दिवस सार्यांनाच प्रेमानं पोटाशी धरायचा आणि जगण्याचं एक निश्चित आश्वासन द्यायचा. ग्रहगोल फार वक्र नव्हते अन् नियतीही तशी सरळ होती. भाकरीचा प्रश्न सोडवताना तिन्ही प्रहर अन् दिवसरात्रीची सीमारेषा ती पुसत नव्हती. जगण्याची गतीही संथ असल्याने चालताना धाप लागत नव्हती आणि त्याचा फारसा भारही नव्हता. तो 50 सीसीच्या लूना टीएफआरच्या आवाक्यात होता. वाढत्या प्रपंचाला बजाज स्कूटरचा आधार होता !
🔲 पूर्वी आपण मर्यादापुरुषोत्तम होतो. दूरदर्शनशी आपला लग्नाच्या बायकोसारखा निष्ठेने संसार चालायचा. रिमोटने शेकडो चॅनेलची छेड काढणं नसायचं. बुधवारच्या चित्रहारची आणि रविवारच्या रंगोलीची आठवडाभर आस असायची अन् अवघ्या चार गाण्यातही आमची सांस्कृतिक भूक भागायची! शोभना जगदीश अथवा सलमा सुलतान शांतपणे समाचार वाचायच्या. ‘आसाम मे भारी बाढ’ वगैरे टाईपच्या बातम्या असायच्या. ‘मौसम की जानकारी ‘ सांगेपर्यंत त्या शिस्तीने पाहिल्या जायच्या ! उगा आरडाओरड नाही वा दर तासाला ब्रेकिंग न्यूजच्या नावानं हल्लागुल्ला करुन लोकांच्या छातीत धडकी भरवणंही नाही. प्रक्षेपणातला अडथळा अँटेना हलवून ठिक व्हायचा. नाही झाला तर ‘रुकावट के लिए खेद ‘ असायचा!
🔲 घराघरांमधली सकाळ रेडिओच्या तालावरच उगवायची. ‘सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे’ ऐकत पोरं शाळेत निघायची. ‘फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी!’ लागेपर्यंत सावकाश पोहोचायची. “ये आकाशवाणी है, अब आप रामानुजप्रसाद सिंह से समाचार सुनिए ..” अशा धीरगंभीर शब्दांनंतर रात्री ‘फौजी भाईंयोके लिए’ जयमाला आणि मौजी भाईयोके लिए बिनाका गीतमाला असायची. आवडीचं गाणं ऐकण्यासाठी चार रटाळ गाणी ऐकण्याचा पेशन्स लोकांकडे असायचा!
🔲 हॉलमधला गोल डायलचा एकच काळा फोन घरातल्या साऱ्यांसोबतच ‘पीपी नंबर’ देणाऱ्या शेजाऱ्यांचाही असायचा. त्याची रिंग टेंशन देणारी नसायची. खूपदा ती एखादया गुड न्यूजची हुरहूर द्यायची आणि आलेला निरोपही तसा दिलाशाचा असायचा. सारं व्यवस्थित. काळजीचं कारण नाही. सवडीने कॉल कर म्हणून. टपालपेटीशी छोट्या पोरांचा परिचय असायचाच. दारावरनं पुढे गेलेल्या पोस्टमनला ‘काका, आमचं पत्र आहे का, असं विचारण्याची रित होती ! कधी तरी येणारं पंधरा पैशाचं कार्ड साऱ्यांचीच जिव्हाळ्यानं वास्तपुस्त करायचं. मोठयांना नमस्कार करून बालगोपाळांचा गोड पापा घ्यायचं आणि त्यातून झालेली अर्धी भेटही पुरेशी असायची !
🔲 अनेकांसाठी आता केवळ पुराव्यासाठी उरलेलं रेशन कार्ड तेव्हा साऱ्या घराला महिनाभर खाऊ घालायचं. रेशनिंग ही आमची एकूणच जीवनपद्धती होती. खाण्यातली साखरही तशी जास्त करुन जगण्याला गोडी देणारी शर्करा होती. प्रॉब्लेम देणारी शुगर झाली नव्हती ! पंगतीत बुंदी-जिलेबी वाढणाऱ्याची वाट पाहिली जात होती. कॅलरीच्या भीतीने ती पानातून हाकलली जात नव्हती !
सणासुदीचं औचित्य होतं. सहामाहीचं टाईमटेबल मिळतानाच दिवाळीची आस लागायची आणि आलेली दिवाळीही साऱ्या वातावरणात भारुन जायची. गावी जाणं, नवे कपडे, करंज्या, चकल्या, अनारसे अशा गोष्टींना तिचंच निमित्त असायचं. हंगामी चकलीचा तेव्हा बारमाही चखणा झाला नव्हता. चंगळवाद नसल्याने लवंगी फटाक्याच्या लडी दिवाळीनंतरही उरायच्या. जगणं तसं अभावाचं होतं पण सुखासमाधानाच्या प्रभावाचं होतं !
🔲 पाऊसपाणी तसं नियमित असायचं. ऋतुंनी माणसांशी बेईमानी केली नव्हती. कारण माणसांनीही त्यांना ग्लोबल वार्मिंगचा ताप दिला नव्हता. लहान पोरांना मातीत खेळण्याची सवय असल्याने सृष्टीतलं वात्सल्य टिकून होतं आणि नदीलाही वर्षभर पान्हा फुटलेला असायचा ! विषाणुंना माणसांबद्दल जीवघेणी खुन्नस नव्हती. पेशंटला डॉक्टरपेक्षा इंजेक्शनचीच जास्त भीती होती. तशी उलटी- जुलाब नाही तर डोकेदुखीची
तक्रार असायची आणि ड्रॉवरमध्येच सारिडॉनची गोळी सापडायची. नाकांवरचा मास्क फक्त ऑपरेशन थिएटरमध्ये दिसायचा. बाकी श्वासांवर कोणाचा अविश्वास नसायचा. मरणही तसं फार स्वस्त झालं नव्हतं कारण तेव्हा जाण्याचंही एक वय होतं!
🔲 बच्चनसारखी बिटल कट हेअरस्टाईल ठेवणारा पक्या ‘एक दुजे के लिए’ पाहून इमोशनल व्हायचा आणि गल्लीतल्या संगीसाठी महिनोंमहिने झुरायचा. दोन्ही वेण्या पुढे घेऊन टायपिंगच्या क्लासला जाताना तिही कधीतरी त्याला ‘अखियोके झरोके से’ पहायची. चुकून कधीतरी चिठ्ठी जायची. बऱ्याचदा हे मुकं प्रेम नजरानजरांमध्येच विरुन जायचं. उठलेले तरंग नंतर सावकाश शांत व्हायचे. लग्नात चि. सौ. कां. संगिता ( H.S.C.) नवरदेवासोबत थम्सअपच्या बाटलीत एकत्र स्ट्रॉ बुडवून फोटो काढायची आणि पंगतीत भात वाढणाऱ्या पक्याकडे हळूच तिरक्या नजरेने पाहायची. त्यानंतर बरेच दिवस पक्याच्या टेपरेकॉर्डरवर प्रेमरोगची गाणी लागायची!
🔲 शास्त्री-वेंगसरकर खेळत असायचे. धडपड करुन एकेरीदुहेरी धावा काढल्या जायच्या. बॅटीशी बॉलचे हाडवैर नव्हते. तो जास्त करून जमिनीवर असल्याने चौकार-षटकारांची चैन नव्हती. जिंकण्यासाठी बॉल कमी अन् रन जास्त झाले की जाम टेंशन यायचं. मॅच बोअर झाली तरी त्यात जान असायची कारण ती फिक्स नसायची !
🔲 दिवस तसे अच्छे होते. बच्चे मन के सच्चे होते. पाटी फुटल्यावर शाळा सुटायची. छडी छमछम लागूनच घमघम विद्या यायची. कारण शिकवणाऱ्या बाई आदरणीय होत्या. त्यांची एकेरीवरची टीचर झाली नव्हती. कॉलनीतल्या काका- मावशीचेही आंटी-अंकल झाले नव्हते. शेजारून वाटीत भाजी यायची. पापड-कुरडयाच्या मदतीची परतफेड व्हायची. रुसवेफुगवे असले तरी नात्यांमध्ये ओल असायची. नणंदेची पोरं आल्यावर मामाची सुगरण बायको रोज शिकरण करायची. पोरांच्या उनाडक्यांनाही बऱ्यापैकी चाप होता कारण घरात बापाचा, शाळेत गुरुजींचा आणि त्यामधल्या रस्त्यावर समाजपुरुषाचा धाक होता !
🔲 देशातले पंजाब आणि काश्मीर हे दोनच प्रश्न माहीत होते. बाकी साऱ्यांच्या ओठी ‘मिले सूर मेरा तुम्हारा…’ चे सूर होते. गावांचे गावपण टिकून होतं. शहरांच्या वाढत्या हद्दीत ती विरघळली नव्हती. बरंच काही अस्सल गावरान होतं. सारंच हायब्रीड वैराण नव्हतं. लोक तसे लॉजिकल आणि बेसिक फिचर्सवाले होते. त्यांचे अंतरंग जास्त करुन ब्लॅक अँड व्हाईटमध्येच असल्याने वेगवेगळ्या शेडसमध्ये ते हरवले नव्हते. कधी तरी एखादया निमित्ताने फोटो निघायचा. त्यात खरोखरच उत्कटता असायची. घरातली सारी मंडळी एकाच फ्रेममध्ये मावायची. तोंडे जास्तीत जास्त चांगली कशी येतील याचीच साऱ्यांना चिंता असायची. फोटो काढताना बोटं दाखवून थोबाड वाकडं करण्याची वात्रट सवय पोरांना नसायची !
🔲 तेव्हा फ्रीज, टीव्ही, स्कूटर प्रत्येकाचं मोठं अप्रुप होतं. त्यांचं आगमन साऱ्यांना कळायचं आणि तोंडही गोड व्हायचं ! बाथरूममध्ये लक्स-लाईफबॉय, किचनमध्ये सुमितचा मिक्सर, बेडरूममध्ये गोदरेज कपाट, त्यावर व्हीआयपी सुटकेस, अंगावर सफारी सूट, हातात एचएमटी घड्याळ, पायात बाटाचे बूट, पारले-मोनॅकोची बिस्किटे, दाराशी राजदूतची फटफटी तर गावाला जाण्यासाठी एसटी! तेव्हाचे चॉईस असे लिमिटेड होते पण त्यातलं सुख अनलिमिटेड होते. काळ्या मंजनने दात पांढरे व्हायचे आणि साध्या पत्रट डब्यातली पावडर लावूनही पोरी गोऱ्या दिसायच्या ! जगणं फार ब्रँडेड अन् महाग नव्हतं. ते साधं अन् स्वस्त होतं पण त्यात एक सत्व होतं. बाजारात रुपयाच्या नोटेला आणि समाजात सामान्य माणसाला महत्त्व होतं!
. . . बेगडी जगण्यामागे धावत आपण खूप पुढे आलोय. आता भडभडून जाणवतंय की खरं जगणं तर मागेच राहिलंय. आजही त्या रम्य दिवसांची भरभरून याद देते आणि आतून एक व्याकूळ साद येते,
कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन!