• Home
  • *आज पस्तीस वर्षानंतर,पाऊल ठेवले सोनज्या डोंगरावर …!!*

*आज पस्तीस वर्षानंतर,पाऊल ठेवले सोनज्या डोंगरावर …!!*

*आज पस्तीस वर्षानंतर,पाऊल ठेवले सोनज्या डोंगरावर …!!*

*मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत)-* बालपणाचा काळ सुखाचा असे म्हटले जाते.ते अगदी खरंच आहे,मी लहान असताना वयाच्या अवघ्या चौदाव्या पंधराव्या वर्षी या कौळाणे (नि) गाव परिसरातील गावांना व-हाणे, सोनज भागात मनमुराद फिरलेलो आहे .हिंडलेलो आहे.सोनजला तर माझे शिक्षणच झाले त्याशिवाय माझ्या जिज मामाचे सोनज हे गाव.दादाजी रामभाऊ बच्छाव हा माझ्या आईच्या सख्ख्या मावशीचा म्हणजे तोलाबाईचा मुलगा!आई असताना अधून मधून सोनजला त्याचे घरीही येणे जाणे व्हायचे.माझ्या बालपणाचा सर्वाधिक मोठा काळ हा व-हाणे गावी गेला.दादाजी रतन शेवाळे हा माझ्या आईच्या मामाचा मुलगा म्हणजे मेव्हणभाऊ!या भागात खुप हिंडलो,फिरलो.व-हाणे सोनज गावाच्या सीमारेषेवर असलेला सोनज्या डोंगर हा लहानपणी जेव्हा पहिल्यांदा बघितला तर माझे मन अक्षरशः भारावून गेले.अतिविशाल असा हा डोंगर माझ्या मनावर केवढी मोठी छाप पाडून गेला.लहानपणी या डोंगरावर मित्रांबरोबर खुपदा फिरलो आहे.डोंगरामागील आमराईत फिरणे,कुरधान्यात बांधून आणलेले लोणचे भाकर खाणे,ती मजाच काही और होती.कौळाणेहून तर अनेकदा पायी पायीच या डोंगरावर जाताना सोबत अण्णासाहेब भाऊचा संजू (लाला),बळीराम दुकानदाराचा कारभारी जिभाऊ, गोसाव्याचा विकास,भिल्लांचा मध्या,राजवाडयातील राजेंद्र वाघ,प्रकाश वाघ,माझ्या मामाचा मुलगा भाऊसाहेब बोरसे हि समवयस्क मित्रमंडळी सोनज्या डोंगराच्या भटकंतीत आम्ही शेतातून भुईमुगाच्या शेंगा,वाळके चोरुन खाण्यात काही वेगळाच आनंद मिळायचा.झाडावरील बोरे खाणे आणि दिवसभराचा सोनज्या डोंगरावर भटकंतीचा आणि मौजमजेचा तो काळ आता आठवला तरी ते बालपणीचे दिवस जसेच्या तसे नजरेसमोर उभे राहतात.या सोनज्या डोंगराबद्दल लहानपणी एक अख्यायिका ऐकलेली आहे.ती खरी किंवा खोटी या वादात मला पडायचे नाही.परंतु कदाचित कपोलकल्पित कथाही असू शकते असा अनुमान आपण काढू शकतो.या सोनज्या डोंगराजवळच एक भुयार असून या भुयारात एक महान तपस्वी ऋषी राहायचा असे सांगितले जाते की,या डोंगरावर सोनजचा एक गुराखी रोज गुरे चारण्यासाठी जायचा मात्र त्याच्या गाईच्या कळपातून रोज एक गाय चरत असतानाच गायब व्हायची व सायंकाळी बरोबर गायीच्या कळपात यायची.मात्र एक दिवशी त्या गुराख्याने गाईवर पाळत ठेवली आणि गाईच्या मागोमाग तो गुराखीही चालू लागला.तर ती गाय भुयारात शिरली तसा तो गुराखीही गाईची शेपटी धरुन गाईच्या मागोमाग भुयारात शिरला आणि तेथील दृश्य पाहून तो गुराखी अक्षरशः चक्रावून गेला.कारण त्या भुयारात गाय हि महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करायला लागली.तर ऋषी तपचर्यत मग्न होता.त्यावेळी समाधीस्थ असलेल्या ऋषीने त्या गुराखीकडून बघून ते कोपऱ्यात पडलेले पोते उचलून घेऊन जा आणि परत इकडे येऊ नकोस.त्याशिवाय हे पोते कुठे खालीही ठेऊ नकोस आणि मागे पाहू नकोस असे ऋषीने त्या गुराख्याला बजावले.मात्र गुराख्याला ती गंमत वाटली म्हणून तो भुयारातून बाहेर येऊन आपल्या गावाकडे गुरांसह जाण्यास निघाला.त्याने ऋषीने दिलेले ते पोते अर्ध्या रस्त्यावर गेल्यावर तेथेच ठेऊन दिले.व थोडया वेळाने पुन्हा ते पोते उचलून गावाकडे चालू लागला.घरी येऊन पोत्यात बघतो तर काय?सगळा कोळसाच निघाला.परंतु पोत्याच्या एका कोपऱ्यात सोन्याचा तुकडा त्या गुराख्याला मिळाला.त्यावरुनच या डोंगराला सोनज्या व शेजारील गावाला सोनज हे नाव पडल्याचा इतिहास सांगितला जातो.बालपणी बघितलेला हा डोंगर आणि त्याबद्दल ऐकलेला हा इतिहास आज वयाच्या ४९व्या वर्षीदेखील मनात पक्का घर करुन बसला आहे.नंतरच्या काळात उद्योग व्यवसायानिमित अनेक गावाना भेटी दिल्या मोठमोठया डोंगरावर फिरलो.मात्र सोनज्या डोंगराबद्दल असलेले प्रेम व आपूलकी अजिबातही कमी झाली नाही.आज पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदाच सोनज्या डोंगरावर माझा मुलगा आंशूराज ड्रायव्हर अजय सोबत गेलो.संपूर्ण डोंगर हिंडलो,फिरलो जुन्या आठवणींना उजाळा दिला.बालपणीचे दिवस नजरेसमोर तरळू लागले.पण..,माझ्यासोबत हा आनंद लुटताना माझे लहानपणाचे कुणीच मित्र नव्हते.जो तो आपआपल्या उद्योग व्यवसायानिमित बाहेरगावी वास्तव्यास असल्याने,मग साहजिकच माझे तोंडून वाक्य निघाले.”लहानपण देगा देवा,मुंगी साखरेचा ठेवा”हा विचारच डोक्यात घोळवत सोनज्या डोंगरावरुन मालेगांवकडे निघालो.
*मुख्य संपादक*
*ए.बी.एन.मिडीया नेटवर्क*
*युवा मराठा न्युज चँनल महाराष्ट्र*

anews Banner

Leave A Comment