🛑 नालासोपारा येथे तीन मुलांची हत्या करून पित्याने केली आत्महत्या..! 🛑
✍️नालासोपारा ( अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पालघर:⭕ जिल्ह्यातील नालासोपारा पूर्वेच्या डॉन लेन परिसरात शनिवारी रात्री एका व्यक्तीने आपल्या तीन लहान मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नी सोडून गेल्याने नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. शनिवारी (दि.२७) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, कैलास परमार (वय ३५) असे आपल्या मुलांची हत्या करुन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो नालासोपाऱ्यातील पुर्वेच्या डॉन लेन परिसरातील बाबूल पाडा य़ेथे राहत होता. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने नंदीनी (वय ८), नयना (वय ३) आणि नयन (वय १२) या तीन मुलांची चाकूने गळा चिरून हत्या केली आणि नंतर स्वत:वर देखील चाकूने वार करून आत्महत्या केली.
दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना घरात एक साडी छताला टांगलेली आढळून आली. यामुळे कैलासने मुलांची हत्त्या करुन स्वतःवर वार करण्याआगोदर गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पाठविले आहेत. तर सध्या पत्नी सोडून गेल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे पालघर पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी सांगितले. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत…⭕