आशाताई बच्छाव
आदिवासी समाजातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत
– जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
जालना,दि.4 (जिमाका/दिलीप बोंडे जिल्हा प्रतिनिधी): केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदि कर्मयोगी अभियान योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील 24 गावातील आदिवासी समाजाच्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहत आयोजित प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान बैठकी दरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर, उप मुख्य कार्यकारी पंचायत उदयसिंग राजपूत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन आर. डी. तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता एल. बी. बारगिरे, प्रकल्प अधिकारी श्रीमती चेतना मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी संबंधित विभागातील अधिकारी यांना सदर योजनेंतर्गत पुढील प्रमाणे सामुहिक विकासाच्या योजना राबविणे अपेक्षीत असल्याचे सांगितले. यामध्ये आवास योजना, जल अपुर्ती साधने विहिरी, हॅन्डपंप, ट्युबवेल, पाण्याच्या टाक्या, जलाशये, नहरे इत्यादी, आरोग्य व पोषण, शिक्षण, रस्ते व दळणवळण, वीजेची जोडणी, सामुदायीक व धार्मिक सुविधा मध्ये मंदीर, मस्जिद, चर्च किंवा अन्य धार्मिक स्थळे विकास, दूरसंचार साधनामध्ये टपालघर, टेलीफोन बुथ, मोबाईल टॉवर, रेडीयो सूचना बोर्ड, बाजारपेठ व व्यापार साधने, स्वच्छतागृहे, सामुदायीक शौचालये, मलनिस्सारण योजना, कृषि सहायता मध्ये पशुशाला, अन्न गोदाम, सिंचन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.






