आशाताई बच्छाव
तुळजाभवानी नगर मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग
जालना |दिलीप गंगाराम बोंडे जिल्हा प्रतिनिधी
गणेशोत्सव-2025 च्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जोपासण्यासाठी श्री तुळजाभवानी नगर मित्र मंडळ, जालना यांच्या वतीने काल भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे तांत्रिक सहकार्य जनकल्याण ब्लड बँक, जालना यांनी केले. शहरातील विविध भागातून युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. अवघ्या दोन तासांत तब्बल 32 जणांनी रक्तदान करून समाजहिताचा एक उत्तम आदर्श घालून दिला.
या रक्तदात्यांमध्ये मंडळाचे काही सदस्य, तुळजाभवानी नगरमधील तरुण तसेच 7 महिलांचा समावेश होता. महिलांचा सहभाग हा विशेष उल्लेखनीय ठरला असून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन रक्तदानाचा संदेश दिला.
शिबिराचे उद्घाटन मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी रक्तदात्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. रक्तदानासाठी जनकल्याण ब्लड बँक यांच्या वैद्यकीय टीमने तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहून सर्व सुविधा पुरवल्या. रक्तदानापूर्वी प्रत्येक रक्तदात्याची सविस्तर आरोग्य तपासणी करून सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली. तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्रासह अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.
या प्रसंगी जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कैलास गोरंटयाल, सामाजिक कार्यकर्ते विष्णू पचफुले व विक्रांत ढक्का यांनी मंडळाला भेट देऊन रक्तदात्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले. त्यांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांची प्रशंसा करून मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुढील काळातही सेवा व समाजकार्याची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले.
शिबिरात प्रथमच रक्तदान करणाऱ्यांचा उत्साह विशेष उल्लेखनीय ठरला.






