आशाताई बच्छाव
प्रा.आनंद भोजने,
राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…
लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्काराचे” वितरण कोल्हापूरात मोठ्या दिमाखात करण्यात आले.
वानखेड, स्वप्नील देशमुख:-ता. संग्रामपूर येथील पण सध्या कोल्हापूरात स्थायिक झालेले प्रा.आनंद भोजने यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस निरीक्षक योगेश गुप्ता तसेच दिल्लीचे राजेंद्रसिंह वालिया(ॲन्टी करप्शन ब्युरो ) व विधीतज्ञ ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते या वर्षीचा “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.
प्रा.आनंद भोजने हे सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले वानखेड गावचे सुपूत्र. लहान पणी शेतात, तसेच वीटभट्टीवर काम केले. अपार कष्ट करून कोल्हापूरातील नामांकित न्यू कॉलेज मध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांचे शिक्षण औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद विज्ञान महाविद्यालयात झाले. तसेच उच्च शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले. आज कोल्हापूरात ज्ञान दानाचे मोलाचं काम करत असताना सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
सध्या ते ११ व१२ (विज्ञान) चे गणित विषयाचे क्लासेस घेतात.
त्यात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना बोर्ड , सीईटी, व जेईई माफक दरात शिकवितात. सरांचे भरपूर विद्यार्थी विदेशात गेले आहेत.
प्रा. आनंद भोजने यांच्यावर शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रभाव आहे.
त्यामुळे ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या खेड्यांमधे स्वखर्चाने जाऊन महापुरुषांचे विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपट,माहितीपट गेली 18 वर्षे सतत दाखवित आहेत. तसेच त्यांच्या अश्वघोष आर्ट अँड कल्चर फौंडेशनच्या वतीने या वर्षी संविधानाच्या प्रास्ताविकीचे 16 भारतीय भाषांमध्ये सादरीकरण करून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
प्रा. आनंद भोजने यांचा कोल्हापूरातील विविध सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असतो.
गावाकडे काही दिवसांसाठी आल्यावर सुद्धा स्वस्थ बसत नाही.
वेगवेगळ्या खेड्यांमधे जाऊन प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करतात.
अशाप्रकारच्या कार्यामुळे त्यांना या वर्षीचा “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे संपन्न झाला.






