*प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे इनामला आश्वासन*
*युवा मराठा न्यूज*
इचलकरंजी नगरपालिकेतील भ्रष्ट कारभार आणि असंवेदनशील बनलेले कारभारी ,प्रशासन यांच्याविरोधात आज गुरुवारी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रवेशव्दारासमोर एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला नगराध्यक्षा यांनी भेट दिली व विविध राजकीय पक्ष ,सामाजिक संघटना ,संस्था आणि जागरुक नागरिकांनी पाठिंबा दर्शवला.
इचलकरंजी नगरपालिकेतील भ्रष्ट कारभारामुळे शहरातील अनेक विकासकामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली आहे. याशिवाय कारभारी मंडळींकडून होणाऱ्या हस्तक्षेपामुळे कामांचा दर्जाही घसरला आहे. त्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये समन्वयाची भूमिका नसल्याने कोणत्याच विकासकामांच्या तक्रारीचे गांभीर्य घेत जातले नाही. त्यामुळे ब-याचदा वादावादीचे प्रसंग उदभवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.यातूनच आपल्या मुलभूत न्याय हक्कासाठी नागरिकांना लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन ,मोर्चे काढण्याची वेळ आली आहे.ब-याचदा शहरातील विकासकामांसाठी सामाजिक कार्यकर्ते सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करतात. पण ,त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात कारभारी आणि प्रशासन धन्यता मानतात , हा आजपर्यंतचा वाईट अनुभव आहे.पालिकेतील भ्रष्ट कारभाराचा परिपाक म्हणजेच नुकताच सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी आपल्या तक्रारीची पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या नैराश्यातून आत्मदहन केले.
पालिकेतील भ्रष्ट कारभार आणि असंवेदनशील बनलेले कारभारी,प्रशासन यांच्या विरोधात आज गुरुवारी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने अन्नत्याग आंदोलनात आप्पासाहेब पाटील,अमितकुमार बियाणी,सुहास पाटील, चंद्रशेखर कोष्टी,धैर्यशील कदम,अमोल ढवळे,अभिजित पटवा यांनी सहभाग घेतला.
इचलकरंजी नगरपरिषदेत मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रलंबित अर्ज त्वरित मार्गी लावावेत व कारभार सुधारण्याबाबत निवेदन देण्यात आले.त्यावर मुख्याधिकारी यांनी संदर्भीय पत्रास अनुसरून प्रलंबित समस्या निदर्शनास आणून दिल्यास तात्काळ मार्गी लावण्याचे लेखी पत्र दिले.सदर समस्यांसाठी आढावा बैठकीची मागणी इनामतर्फे करण्यात येऊन अन्नत्याग आंदोलनाची सांगता करण्यात आली.
आंदोलन यशस्वी होण्याकरिता इचलकरंजी नागरिक मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
मोहन शिंदे ,
कोल्हापूर जिल्हाप्रतिनिधी .