आशाताई बच्छाव
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीत घेतला विविध विषयांचा आढावा
जालना, दि.16(जिमाका): विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथील शासकीय विश्रागृहात आयोजित आढावा बैठकीत जालना जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेवून प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणी टंचाई व ऊसतोड आणि घरकाम कामगार आदी विषयांचा संबंधीत विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्र. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, महिला बालविकास अधिकारी कोमल कोरे, सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. कापसे आदींची उपस्थिती होती.
ऊसतोड कामगार महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतांना श्रीमती डॉ गोऱ्हे म्हणाल्या की, ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. नोंदणी झालेल्या ऊसतोड कामगारांना नोंदणी कार्डचे वितरण करावेत. तसेच शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील घरकाम करणाऱ्या कामगारांचे सर्वेक्षण करुन त्यांची माहिती संकलीत करावी. केवळ मुलींची माता असल्याने नाकारण्यात येणाऱ्या मातांना मदत करण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यात बालविवाहाच्या बाबतील चांगले काम झाले आहे. परंतू हे प्रमाण कमी करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती होणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने समाजसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी करून घ्यावे.