आशाताई बच्छाव
मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या घरी सांत्वन भेट
मिराबाई फाल्गुनराव पटोले यांच्या प्रतिमेला अभिवादन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांच्या मातोश्री स्व. मीराबाई फाल्गुनराव पटोले यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमानिमित्त स्वगाव सुकळी/महालगाव येथे ( शुक्र. १० जाने.) ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आ. नाना पटोले यांच्या घरी सांत्वना भेट दिली व चर्चा केली.
सुकळी येथे आ. पटोले निवासस्थानी गाड्यांचा ताफा पोहचताच सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री स्व. मिराबाई फाल्गुनराव पटोले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. पाऊण तास मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष पटोले आणि कुटूंबीयांसह दिर्घ चर्चा केली. नंतर मुख्यमंत्री फडणवीस हे सुकळी येथून दुसऱ्या ठिकाणी रवाना झालेत. यादरम्यान जिल्हा पोलीस यंत्रणा, बॉम्ब शोधक व नाशक पथक नागपूर, साकोली पोलीस चमु आणि वाहतूक पोलीसांनी भंडारा – साकोली – न्यायालय गोवर्धन चौक – सावरबंद वडद रोड आणि सुकळी महालगाव पर्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता. आ. नाना पटोले यांच्या निवासस्थानी मातोश्री स्व. मिराबाई फाल्गुनराव पटोले यांना श्रद्धांजली देण्यासाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, खासदार, आमदार आणि जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुकळी महालगाव येथे हजेरी लावली होती.






