आशाताई बच्छाव
प्रेमसंबंधात अडथळा नको म्हणून पत्नीने दिराच्या साथीने केला पतीचा खून
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- पतीच्या नियमीत होणार्या त्रासाला कंटाळून पत्नीने चुलत दिराशी पे्रेमसंबंध ठेवले.या प्रेम संबंधात अडथळा निर्माण होईल म्हणून पत्नीने दिराच्या मदतीने ब्लेडच्या सहाय्याने पतीच्या पोटावर वार करून तसेच दगड डोक्यात टाकून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पतीचा मृतदेह अपघात वाटावा म्हणून त्याचा मृतदेह कोदगाव शिवारात महामार्गावर टाकून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
चाळीसगाव शहर पोलीसांनी शिताफीने तपास करून मयताच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर या खूनाचे रहस्य समोर आले. पतीचा खून करणार्या पत्नीसह तिचा प्रियकर अशा दोघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग 52 वर कोदगाव शिवारात कुणाल बुुंदेलखंडी यांच्या शेताजवळ मंगळवार 18 रोजी रात्री 10.45 वाजेच्या पूर्वी बाळू सिताराम पवार रा. गवळीवाडा, नायडोंगरी ता. नांदगाव याचा मृतदेह आढळून आला. कोणत्यातरी वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यु झाला असावा अशी शक्यता धरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
मात्र बाळू पवार यांच्या मृत्युबाबत पोलीसांनी शंका आल्याने फॉरेन्सिक टीमला पाचारण केले.घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड मिळून आला. बाळू पवार याच्या शरीरावर ब्लेड व दगडाने मारल्याचा खूणा आढळून आल्या. दगड व ब्लेडने गंभीर दुखापत करून त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शी दिसून आले.
पोलीसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वंदना पवार हिचे लोकेशन घेतले असता ती चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाली.पोलीसांनी तिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले.तिचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने पोलीसांनी तिला बोलते केले असता पतीच्या खूनाची कबुलीच तिने दिली.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत बाळू पवार याची पत्नी वंदना बाळू पवार व गजानन राजेंद्र पवार या दोघांच्या विरोधात भादंवि कलम 302,201,120ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.