Home नांदेड प्रचार संपला; 26 एप्रिलला सकाळी 7 पासून मतदान 48 तासांच्या शांतता कालावधीला...

प्रचार संपला; 26 एप्रिलला सकाळी 7 पासून मतदान 48 तासांच्या शांतता कालावधीला सुरुवात प्रशासनाची तयारी पूर्ण ; 25 एप्रिलला सकाळीच पोलिंग पार्ट्या रवाना होणार

27
0

Yuva maratha news

1000312554.jpg

प्रचार संपला; 26 एप्रिलला सकाळी 7 पासून मतदान
48 तासांच्या शांतता कालावधीला सुरुवात
प्रशासनाची तयारी पूर्ण ; 25 एप्रिलला सकाळीच पोलिंग पार्ट्या रवाना होणार
जिल्हयामध्ये कलम 144 लागू; सर्वत्र चोख बंदोबस्त
शुक्रवार फक्त मतदानासाठी राखीव ठेवा ; प्रशासनाचे आवाहन
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 23 : 16- नांदेड लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला बुधवारी सायंकाळी 6 वाजतापासून सुरुवात झाली आहे. या काळात कोणत्याही राजकीय पक्षाला प्रचार करता येणार नाही. जिल्हा प्रशासनाने आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीची पूर्ण तयारी केली असून उद्या सकाळी सात वाजता पासून पोलिंग पार्ट्या रवाना होणार आहे. सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघातील 2062 मतदान केंद्रावर 18 लक्ष 51 हजार मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत.

नांदेड लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणामध्ये आहेत. २६ एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे. २३ उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी आज खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. तर मतदान कर्मचारी अधिकारी यांचे शेवटचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण ठिकठिकाणीच्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. जिल्हा प्रशासनाने आज सर्व यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी निवडणूक प्रक्रिया तसेच कायदा व सुव्यवस्था या संदर्भात विभाग प्रमुखांची व भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दाक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड, यांच्यासह हिंगोली मतदारसंघात येणाऱ्या किनवट व हादगाव येथील सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.

एकूण १८ लक्ष ५१ हजार मतदार
नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (२९४४०९), नांदेड उत्तर (३४६८८६), नांदेड दक्षिण (३०८७९०), नायगाव (३०१२९९), देगलूर (३०३९४३), मुखेड (२९६५१६) असे एकूण १८ लक्ष ५१ हजार ८४३ मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये ९ लक्ष ५५ हजार ८४ पुरुष तर ८ लक्ष ९६ हजार ६१७ महिला तर १४२ तृतीय पंथीचा समावेश आहे.

२९ संवेदनशील केंद्र
जिल्ह्यामध्ये 16 नांदेड मतदार संघात 29 संवेदनशील मतदान केंद्र आहेत.५ शाडो मतदान केंद्र आहे. 16 ठिकाणी महिला व्यवस्थापनातील मतदान केंद्र आहेत. दिव्यांगांसाठी विशेष अशा सहा मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. १०० टक्के तरुण अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती असणारे 16 केंद्र आहेत. इको फ्रेंडली मतदान केंद्राची संख्या ०६ आहे, नांदेड दक्षिणमध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड, या ठिकाणी महिला मतदार केंद्र उभारण्यात आले आहेत. गुजराती उच्च माध्यमिक शाळा वजीराबाद येथे दिव्यांग मतदान केंद्र, उत्तर नांदेड मध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहे तर शंकरराव चव्हाण इंग्लिश स्कूल या ठिकाणी महिला मतदान केंद्र केंद्रीय विद्यालय दक्षिण मध्य रेल्वे या ठिकाणी युवा मतदान केंद्र तर ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.

१० हजार ६३७ कर्मचारी कार्यरत
नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी १० हजार ६३७ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये केंद्राध्यक्ष २७६६, इतर मतदान अधिकारी ७९२१,क्षेत्रीय अधिकारी २४२, याशिवाय मायक्रो ऑब्जर्वर ३९, होम वोटींग करीता ५०, अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहे. आज कर्मचाऱ्यांचे शेवटचे प्रशिक्षण पार पडले असून उद्या कर्मचाऱ्यांना आपापले केंद्र समजणार आहे. उद्या सकाळी हे सर्व कर्मचारी रवाना होणार आहेत. जिल्ह्यात पुरेशा मतदान यंत्राची उपलब्धता आहे.

144 कलम लागू
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तासा अगोदरच्या कालावधीमध्ये सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. बेकायदेशीरिता जमा होता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होता येणार नाही. किंवा एकत्रित फिरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

बुथ व्यवस्थापन महत्वाचे
यासोबतच राजकीय पक्षांनी निवडणूक बूथ कुठे उभारावे, बुथवर कशी व्यवस्था असावी, त्या ठिकाणचे बॅनर बैठक व्यवस्था व गर्दीचे व्यवस्थापन या संदर्भातील निर्बंध जारी करण्यात आले आहे. मतदान केंद्राजवळ शस्त्र बाळगणे किंवा शस्त्र प्रदर्शन करणे प्रतिबंधित आहे.

कडेकोट बंदोबस्त
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी देखील 48 तास आधी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्धारित केलेल्या कर्तव्यात कोणताही कसूर करता कामा नये असे स्पष्ट ताकीद सर्व अधिकाऱ्यांना दिली आहे. रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून फिरत्या पथकांवर अधिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरातील हॉटेल, लॉज, निवारा ठिकाणांची असून तपासणी करण्यात येत असून या काळामध्ये रोकड मौल्यवान वस्तू, भेटवस्तू ,मद्य अमली पदार्थ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे . केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठीक ठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे निवडणूक केंद्रावरही कडे कोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर निर्बंध
प्रचाराचा कालावधी संपल्यामुळे 48 तासापूर्वी मतदार संघाबाहेरील राजकीय नेते कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा,असे आवाहन करण्यात आले आहे. प्रचार कालावधी संपल्यामुळे राज्यकीय कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते मिरवणुकीतील कार्यकर्ते मोहिमेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती प्रतिबंधित करण्यात आली आहे.

मोबाईल वापरावर बंदी
मतदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक आणि अधिकृत निवडणूक पोलिस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्रात शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. मतदार, निवडणूक कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक सुटी ; बाजार बंद
26 एप्रिल रोजी मतदान होत असून या दिवशी मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अत्यावश्यक व खाजगी आस्थापना दुकाने, रेस्टॉरंट सुरु असतील त्या ठिकाणाच्या सर्व व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना दोन तासाची सुट्टी द्यावी, असे आदेश कामगार आयुक्त मार्फत जारी करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार 26 एप्रिल शुक्रवार रोजी बंद ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आठवडी बाजार होते त्या ठिकाणीचे बाजार दुसरे दिवशी घेण्यात येणार आहे.

मतदान केंद्रावर प्रतीक्षालय
नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान करावे असे आवाहन करताना जिल्हा प्रशासनाने यावेळी लाईनमध्ये नागरिकांना उभे राहावे लागू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतीक्षालय उभारले आहे. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती सावलीची व्यवस्था, रांगेविरहित मतदान व्हीलचेअरची व्यवस्था, हिरकणी कक्ष व पाळणा घर, आवश्यकता भासल्यास ॲम्बुलन्सची व्यवस्था केली जाणार आहे.

48 तास मद्य विक्री बंद
कायदा सुव्यवस्थेसाठी बुधवारच्या सायंकाळी सहा वाजता पासून मतदान पूर्ण होईपर्यंत 48 तास मद्य विक्री बंद करण्यात आली आहे.

पोलचीट ( मतचिठ्ठी ) मिळवा !
नांदेड जिल्ह्यात Poll Chit मिळाली नसल्यास कृपया खालील क्रमाकावर +91 75885 69875 या नंबरवर Pchit असा व्हाटस ॲप मेसेज करावा, अधिकृत माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Previous articleआ. गडाख धार्मिक कार्याला पाठबळ देणारे नेतृत्व : ढोक महाराज
Next articleमनस्वी ग्रुप आयोजित आरोग्य शिबीर संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here