Home बीड सीसीटीव्हीवर यापूर्वी खर्च केलेले कोट्यावधी रुपये गेले पाण्यात; आता पुन्हा साडेदहा कोटींचा...

सीसीटीव्हीवर यापूर्वी खर्च केलेले कोट्यावधी रुपये गेले पाण्यात; आता पुन्हा साडेदहा कोटींचा निधी मंजूर!

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20240218_080352.jpg

सीसीटीव्हीवर यापूर्वी खर्च केलेले कोट्यावधी रुपये गेले पाण्यात; आता पुन्हा साडेदहा कोटींचा निधी मंजूर!

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:१७  सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे अल्पावधीतच तीन तेरा होऊन त्यावर खर्च केलेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेले होते. आता पुन्हा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी साडेदहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बीड, परळी, आष्टी या शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यापूर्वी बीड शहरात पालिकेच्या वतीने ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. याचे कंट्रोल पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात होते. सुरुवातीचे काही दिवस हे कॅमेरे चांगले चालले. परंतु नंतर याची देखभाल करण्यात आली नाही. या संदर्भात पोलिसांनी पालीकेला हे कॅमेरे सुरू करण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी निधी नसल्याचे कारण देत हात वर केले होते. सध्याही बीड शहरातील ६० पैकी केवळ दहा कॅमेरे सुरू आहेत. त्यातही साधारण सहा महिन्यापूर्वी या कॅमेर्‍यांची यंत्रणा पोलीसांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ही यंत्रणा हाती येताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्हा नियोजन मधून यासाठी निधीची मागणी केली होती. त्याप्रमाणे बीड, आष्टी व परळी या तीन शहरासाठी १० कोटी ५० लाख रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. आता महिन्याभरात हे कॅमेरे बसविण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले असून बीड शहरात ३५ ठिकाणी १७८ कॅमेरे लावले जाणार आहेत. यासाठी ०४ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. परळी शहरासाठी १३३ कॅमेरे लावण्यात येणार असून त्यासाठी ०३ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला असून तर आष्टी शहरात कॅमेऱ्याची जागा निश्चित करणे सुरू असून यासाठी ०२ कोटी ५० लाख रुपयाचा निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर झाला आहे. या तिन्ही शहरात सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यानंतर त्यांचे नियंत्रण पोलीस अधीक्षक कार्यालयात राहणार असून यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र विभाग तयार केला जाणार आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here