आशाताई बच्छाव
गोगटे- जोगळेकरच्या स्वरूप आणि प्रियांकाला संस्कृतविषयासाठीचा डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार प्राप्त
रत्नागिरी,(सुनील धावडे)- दरवर्षी पदवीस्तरावर संस्कृत विषयात सर्वोत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दादर मधील सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्टच्या वतीने डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार दिला जातो. यावर्षी रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या दोघांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या महाविद्यालयातील संस्कृत विभागातील पदव्युत्तर द्वितीय वर्षात संस्कृत विषयाला असणारे प्रियांका ढोकरे आणि स्वरूप काणे यांनी पुरस्कार प्राप्त केला आहे. दादर येथील कित्ते भंडारी सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यावेळी प्रमुख अतिथी आकाशवाणीच्या निवेदिका मेधा कुलकर्णी, राजपत्रित अधिकारी मंजूषा कुलकर्णी आणि चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशनच्या शैक्षणिक संचालक डॉ. गौरी माहुलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार या दोन्ही विद्यार्थ्याना देण्यात आला.
प्रियांका ढोकरे हिने पदवीला संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळवून मुंबई विद्यापीठात पदवीला प्रथम क्रमांक प्राप्त केला तर स्वरूप काणे याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या दोघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. संस्कृत विभागातील जयंत अभ्यंकर आणि स्नेहा शिवलकर यांनीही याबद्दल दोन्ही विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.