आशाताई बच्छाव
मंत्री लोढा आणि राज ठाकरें भेटीने तर्कवितर्क मुंबई,( ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी असणारे मंगलप्रभात लोढा यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीला २४ तास उलटत नाहीत तोवर मंगलप्रभात लोढा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात भेट घेतली.
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अलीकडच्या काळात राज ठाकरेंची भाजपा नेत्यांसोबत जवळीक वाढली असून मनसे-भाजपा एकत्र येण्याच्याही चर्चा आहेत.
काही दिवसांपूर्वीचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये २ तास चर्चा झाली होती. राज्यात शिंदे गट शिवसेनेतून फुटून वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. आम्ही पक्षातून बाहेर पडलो नाही तर शिवसेना आमचीच आहे आम्ही फक्त नेता बदलला आहे असं शिंदे गटातील आमदार सांगत आहेत. शिंदे गटाच्या या दाव्याबाबत अद्याप कायदेशीर लढाई कोर्टात सुरू आहे. शिंदे गटाला इतर पक्षात विलीन व्हावेच लागेल असं सांगण्यात येते. त्यात पर्यायाने मनसेचं नाव पुढे येते. त्यात शिंदे-फडणवीस सरकारला मनसेनं सभागृहात मतदान केले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता मंगलप्रभात लोढा यांच्या राज भेटीनं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.