Home बुलढाणा वाळू माफियांचे ‘इन्फॉर्मर वॉच डॉग’..! महसूल आणि पोलिसांची डोकेदुखी..? मात्र माफियांची मज्जाच...

वाळू माफियांचे ‘इन्फॉर्मर वॉच डॉग’..! महसूल आणि पोलिसांची डोकेदुखी..? मात्र माफियांची मज्जाच मज्जा.!

23
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0052.jpg

वाळू माफियांचे ‘इन्फॉर्मर वॉच डॉग’..! महसूल आणि पोलिसांची डोकेदुखी..? मात्र माफियांची मज्जाच मज्जा.!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर तालुक्यातील वाळू तस्करीचा प्रश्न नेहमी चव्हाट्यावर आणि चर्चेत असतो. वान नदीपात्रातुन व इतर नदी नाल्यातून होणारी वाळू तस्करी सर्वश्रुत माहीत आहे.
संग्रामपुर तालूक्यातील वाळू तस्करी कधीही थांबलेली नाही. उलट या वाळू तस्करीला मोठे उधाणच आलेले वेळोवेळी दिसून आले आहे. वान नदी मधून होणारी वाळू तस्करी ही स्थानिक कामांसाठी जरी वापरली जात असली, तरीही त्यापेक्षा जास्त प्रमाणात ती जिल्ह्या बाहेर पाठवली जाते. जिल्ह्या बाहेर वाळू पाठवणारे, तस्करी करणारे ठेकेदार मोठे गब्बर झालेले आहेत. त्यामध्ये राजकीय पक्षांचे पुढारी,काही सामाजिक कार्यकर्ते,तर काही पत्रकारिता क्षेत्रातील मंडळी बरेच जण या ना त्या कारणाने सहभागी असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात कोणावर किती कारवाई झाली आणि किती आरोप उघड झाले हा संशोधनाचा विषय आहे.
हप्तेखोरी आणि वाळू तस्करीतून मिळणारा पैसा याकडे सर्वांचे लक्ष आहे. यातून आलेली गर्भश्रीमंतीही सर्वत्र दिसत आहे. एवढे सर्व होत असतांना ही वाळूतस्करी थांबत नाही. विशेष म्हणजे दक्षता समितीचे अध्यक्ष सरपंच हे सुद्धा जबाबदार असतांनी तालुक्यात काही ठिकाणी सरपंचांवर सुद्धा रेती तस्करीची कारवाई झालेली आहे. म्हणजे एका प्रकारे असे म्हणावे लागेल “चोरांच्या हाती तिजोरीची चाबी”आणि एकीकडे संबंधित काही अधिकारी, कर्मचारी, व महसूल विभाग, पोलीस विभाग काय करतो.. ? याविषयी पण चर्चा होते. बऱ्याच वेळा तलाठी, मंडळ अधिकारी व माफीयांन विरुद्ध बातम्या प्रसारित करणाऱ्या पत्रकारांना टार्गेट केले जाते. त्यांच्यावर हल्ले होतात. दादागिरी केली जाते. धमक्या दिल्या जातात. या धमक्या वाळू माफियांच्या असल्या तरी त्या धमक्यांमधे काही राजकीय लोकांचा सुद्धा सहभाग असतो. दोन प्रकारच्या धमक्या या ठिकाणी मिळतात. राजकिय आणि वाळू माफियांच्या. अशी माहिती महसूल विभागातील एकनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून मिळते. मुळात वाळू तस्करी न थांबण्याची अनेक कारणे सांगितली जातात.
महसूल विभागातील विविध कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर काही प्रामाणिक कर्मचारी या वृत्ताला दुजोरा देतात. वाळू तस्करी थांबवणे अवघड असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कारण वाळूमाफियांची एक खास यंत्रणा असून या यंत्रणेतील तरुण मुले ही महसूलच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यात तरबेज झालेली आहेत. तरुणांना व्यसनाच्या आणि पैशाच्या नादी लावून त्यांच्याकडून हे अधिकाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवण्याचे काम करून घेतले जाते. असे ‘इन्फॉर्मर वॉच डॉग’ बहुतांश वाळूतस्कराकडे आहेत. त्यांना दुचाक्या, चारचाक्या, पैसे, दारू, खाणेपिणे सगळे पुरवले जाते. दिवस रात्र ही ‘वॉच डॉग’ मंडळी तहसीलदार, प्रांताधिकारी, महसूल खात्याचे वरिष्ठ अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर नजर ठेवून असतात. हि करडी नजर आणि एकमेकातील भ्रमणध्वनीद्वारे होणारे संपर्क यामुळे वाळू तस्करीवर छापे घालण्याचे काम अवघड होऊन बसते.
विशेष म्हणजे अधिकारी आणि छापा टाकण्यासाठी निघालेले पथक कुठे जाणार आहे, कधी निघणार आहे याची माहिती महसूल खात्यातील काही छुपे हप्तेखोर कर्मचारी व अधिकारी सुद्धा देत असल्याची चर्चा नेहमीच असते अशा हप्ते खोरांच्या मोबाईलचे सी डी आर चेक केल्यास त्यांचे पितळ उघडे पडेल.आणी गावातील आणि तालुक्यातील आपले राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी महसूल, पोलिस प्रशासनातील काही कर्मचारी वाळूतस्करांशी संधान साधून असल्याचे आरोप नेहमी झालेले आहेत. त्या मुळे वाळू तस्करी प्रत्यक्षात थांबवणे अवघड होते. या ‘वॉच डॉग’ मंडळी कडून महसूल विभागातील वाळूतस्करी थांबणाऱ्या पथकातील अधिकारी, कर्मचारी घरातून बाहेर पडले की त्यांचा पाठलाग केला जातो. गुप्तपणे त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते. अधिकारी कुठे निघाला आहे. कुठे जाणार आहे. गाडी कोणती आहे. कपडे कोणते घातले आहेत. सोबत कोण कोण आहे. याची सविस्तर माहिती मोबाईल साखळीद्वारे थेट नदीपात्रा पर्यंत पोहोचविली जाते. त्याचबरोबर ही माहिती वाळू तस्करांच्या छुप्या कार्यालयांमध्ये देखील पोहोचविली जाते.
अधिकारी कार्यालयापासून किंवा घरा पासून नदी पात्रात पोहोचेपर्यंत सर्व माहिती एकमेकांना कळविले जाते. तसेच अधिकारी नदीपात्रात पोहोचू नये म्हणून तस्करांना आश्रय देणाऱ्या राजकीय पुढार्‍यांना देखील फोन द्वारे माहिती सांगितली जाते. त्यामुळे अधिकारी नदीपात्रात पोहोचण्याआधीच कधीकधी राजकीय पुढार्‍यांचे फोन येतात व त्या दबावाला बळी पडून वाळू तस्करी वर छापा घालण्याचे प्रयोजन मागे घेतले जाते.अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. दिवसा-रात्री कधीही अधिकारी बाहेर पडले की त्यांच्यावर हे ‘वॉच डॉग’ पाळत ठेवून असतात. अगदी चोवीस तास. मग हा अधिकारी घरगुती कामाला बाहेर पडो किंवा आपल्या कुटुंबियांसह आपल्या गावी खाजगी कार्यक्रमाला जाणार असो. सर्व इत्यंभूत माहिती या कंपनीकडे असते. पूर्वी अशी माहिती पुरवण्यात अधिकाऱ्यांचे आणि पथकातील फर्जी कोतवाल सुद्धा यात सहभागी असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे प्रत्येक वेळी छापा टाकण्यात अवघड होऊन बसते. ही सर्व माहिती महसूल व पोलिस विभागातल्या कर्मचाऱ्यांकडून केलेल्या चर्चेतून उपलब्ध झाली आहे.
संग्रामपूर तालुक्यातच संपूर्ण अशी यंत्रणा राबवली जाते. त्यामुळे वाळू तस्करी हा न संपणारा विषय बनलेला आहे. वाळू माफियांचे गुप्तहेर शक्यतो तरुण मुले असल्याने त्याचे साईड इफेक्ट सुद्धा जाणवू लागले आहेत. त्यांची व्यसनाधीनता वाढलेली आहे. मिळणारा पैसा त्यांना अवैध कामांकडे घेऊन जात आहे. तरुणांची एक पिढी अवैध कामे गुन्हेगारीकडे वळत आहे, असे चित्र सध्या दिसत आहे. काही ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांकडूनच वसुली पंटर नेमलेले आहेत. काही ठिकाणी अधिकारी सुद्धा असे वसुली पंटर नेमत असतात असे बोलले जाते.महसुली यंत्रणेबरोबरच पोलिस यंत्रणा सुद्धा काही ठिकाणी अवैध वाळू तस्करीला खतपाणी घालण्यात बरबटलेली आहे. रात्री गुप्तपणे फिरणारे पोलीस पथक आणि महसूल विभागाचे पथक यातील काही लोकांचे वाळूतस्करांची संगनमत असल्याचेही आरोप नेहमीच झाले आहेत. काही गंभीर घटना देखील घडल्या आहेत. वृत्तपत्रातून आणि वाहिन्यांमधून वेळोवेळी हे प्रकार चव्हाट्यावर देखील आले आहेत. या माहितीला देखील संबंधित खात्याच्या विविध कर्मचाऱ्यांकडून खाजगीत दुजोरा मिळतो. त्यामुळे अनेक ठिकाणी यंत्रणाच पोखरली गेली असल्याने वाळूतस्करी थांबणार तरी कधी आणि याकडे जिल्हाधिकारी बुलढाणा लक्ष देतील का..? असा प्रश्न उपस्थित होतो.

Previous articleजिल्हा काँग्रेसच्या वतीने ५ ऑगस्टला जेलभरो आंदोलन,आंदोलनात सहभागी होण्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आव्हान
Next articleनायगाव तालुक्यात ढगफुटी, सायंकाळच्या सुमारास बरसला धो पाऊस.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here