
आशाताई बच्छाव
ग्रामसभेत विधवा प्रथा बंदी ठराव मंजूर
पालघर,(वैभव पाटील कार्यकारी संपादक युवा मराठा)
समाजात आजही विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येते आहे. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढली जाणे यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जाते. महाराष्ट्र शासन आणि राज्य महिला आयोगाने या
अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते. त्याला महाराष्ट्रभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. पालघर मध्ये देखील याला उत्तम प्रतिसाद मिळत असून पालघर शहरापासून काही अंतरावर असलेल्या माहीम ग्रामपंचायतीने देखील विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला आहे.
पालघर तालुक्यातील माहीम ग्रामपंचायतीने गुरुवारी ९ जून रोजी झालेल्या मासिक सभेत हा ठराव मंजूर केला. सभे दरम्यान विजय पाटील यांनी या ठराव बाबत सुचवले, त्यास दीपक भंडारी यांनी अनुमोदन दिले आहे. तसेच सर्व सदस्यांनी एकमताने ठरावास मंजुरी दिली. या प्रथेमुळे विधवा महिलांच्या अधिकारावर गदा येत आहे, म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे, तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे. याकरिता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यात यावी, त्यास यासभेची मंजुरी आहे.
या वेळी विद्यमान सरपंच दिपक करबट, ग्रामविकास अधिकारी विजय बिल्लेवार, माजी सरपंच निलम विकास राऊत, माजी सरपंच विजय राऊत, माजी सरपंच विकास मोरे, माजी सरपंच नरेश चौधरी, माजी सरपंच अपेक्षा मेहेर, माजी उपसरपंच शंकर नारले, माजी उपसरपंच मुकेश करबट, माजी ग्रामविस्तार अधिकारी विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनिल राऊत, विलास मोरे, गौरव मोरे, अनिकेत भोमटे, जयश्री वर्तक, रुचिता चुरी, कविता मोरे, आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दताराम करबट, गोपीनाथ चाकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.