Home अकोला अमृत सरोवर’ पुस्तक प्रकाशन सोहळा शेतकऱ्याने ‘उर्जादाता’ व्हावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अमृत सरोवर’ पुस्तक प्रकाशन सोहळा शेतकऱ्याने ‘उर्जादाता’ व्हावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

131
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220528-WA0021.jpg

‘अमृत सरोवर’ पुस्तक प्रकाशन सोहळा
शेतकऱ्याने ‘उर्जादाता’ व्हावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अकोला ,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): ‘अमृत सरोवर’ या योजनेच्या माध्यमातून देशात 75 हजार तलाव, जलाशयांची निर्मिती होऊन जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील तलावांचाही समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना जलसमृद्धी मिळेल. यातून शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिके घेऊन ‘अन्नदाता’ होण्यासोबत पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करुन या देशाचा ‘उर्जादाता’ व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जलसंधारणाची चळवळ म्हणून देशात ‘अमृत सरोवर’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात झालेल्या कामांची पाहणी व लोकार्पण करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोला जिल्ह्यात आले. यानिमित्ताने येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ.ठाकरे सभागृहात ‘अमृत सरोवर’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, कुलगुरु डॉ. विलास भाले, महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरु डॉ.आशिष पातुरकर, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजीत पाटील, आ. अमोल मिटकरी, आ. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. आकाश फुंडकर तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे राजीव अग्रवाल तसेच जिल्हा प्रशासनातील विभाग प्रमुख, शेतकरी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, मला अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीत एका अभियंत्याने विदर्भातील शेतकरी आत्महत्यांबाबत आपण काय उपाययोजना करतात? असा प्रश्न केला. माझ्याकडे समर्पक उत्तर नसल्याने जलसंधारणाच्या कामाची प्रेरणा जागी झाली, आणि शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय करणे,हा अग्रक्रम ठरला. यातून अमृत सरोवर योजनेची संकल्पना आली. ही संकल्पना आधी बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात आली. ती आता अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतीसाठी पाणी नसणे हीच मोठी समस्या असल्याने ती दूर करण्यासाठी अमृत सरोवर योजना महत्त्वाची ठरणार आहे. याच उपक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात 34 शेततळी विकसित करण्यात येत आहेत. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहकार्य आहे. तलाव निर्मितीतून उपलब्ध होणारे मुरुम, माती हे महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येईल, त्या बदल्यात तलावाचे काम विनामूल्य होईल, अशी ही संकल्पना आहे. आज पाहणी केलेल्या ठिकाणी 28 मे या दिवशी पाणी असणे ही मोठी उपलब्धी आहे. यात जुन्या तलावांचा गाळ काढणे, नदी नाल्यांचे खोलीकरण करणे इ. बाबींचाही समावेश करता येणार आहे.

आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री गडकरी पुढे म्हणाले की, शेतकऱ्याला पाण्याची उपलब्धता झाल्यावर या योजनेच्या माध्यमातून विदर्भ सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आहे. कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचवावे. त्यातून शेतकऱ्याने अधिकाधिक समृद्ध व्हावे. अन्नधान्य, तेलबिया उत्पादन घेतांनाच उपलब्ध पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन उत्पादन करुन शेतकऱ्याने केवळ अन्नदाता न होता उर्जादाताही व्हावे, अशी संकल्पना गडकरी यांनी मांडली. या सोबत पशुविज्ञान विद्यापीठानेही आधुनिक तंत्रज्ञान पशुपालकांना उपलब्ध करुन द्यावे व दुग्धोत्पादनात वाढ करावी. कृषी विद्यापीठांमधील संशोधन हे गरजेवर आधारीत असावे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि पाणी व्यवस्थापनातून आपले उत्पादन वाढवावे,असे आवाहनही त्यांनी केले.

संशोधन शेताच्या बांधापर्यंत नेण्यासाठी कृषी विद्यापीठांना 50 कोटी रुपये- दादाजी भुसे

कृषी विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहोचवता यावे यासाठी कृषी विद्यापीठांना दरवर्षी 50 कोटी रुपये विस्तार शिक्षणासाठी देण्यात येतील,असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले. ते म्हणाले की, कृषी विद्यापीठाला अमृत सरोवरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाले आहे,तथापि, हे पाणी वापरता यावे यासाठी राज्यशासन निधी देईल. शेतकऱ्यांनी उत्पादनाकडे लक्ष देतांनाच आपले उत्पादन विक्री करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी ‘विकेल ते पिकेल’ यावर भर दिला आहे.कृषी विद्यापीठांमध्ये मुलींचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे,असेही त्यांनी आवर्जून सांगितले. राज्य शासनाने कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी महिल शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी लक्ष्मी योजना सुरु केली आहे. अमृत सरोवरच्या माध्यमातून कृषी विद्यापीठ तसेच अन्य भागात जलसंधारणाचा लाभ होईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्गचे राजीव अग्रवाल यांनी केले. तसेच कुलगुरु डॉ. भाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी तर कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here