Home संपादकीय छोड देते है ना!        (संपादकीय विशेष)

छोड देते है ना!        (संपादकीय विशेष)

40
0

राजेंद्र पाटील राऊत

FB_IMG_1651931775982.jpg

छोड देते है ना!        (संपादकीय विशेष)

आयुष्यात सर्वकाही मनासारखे मिळत गेले तर आयुष्य जगण्यात खरी मज्जा उरत नाही. कारण काही अपूर्ण स्वप्न, इच्छा आपल्याला आयुष्य जगण्यासाठी वेळोवेळी कायम प्रेरणा देत असतात. काही स्वप्न, इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण खूप प्रयत्न करतो पण त्या गोष्टी मिळाल्या नाही तर आपल्याला वाटते की आपले प्रयत्न वाया गेले. पण प्रयत्न कधी वाया जात नसतात. कारण आपण केलेला प्रत्येक प्रयत्न हा आयुष्यात एक नवा धडा शिकवून जात असतो. जो कधी कोणत्याही पुस्तकात वा वर्गात बसून शिकता येत नाही…

आयुष्याचे दुसरे नाव ‘कभी खुशी कभी गम’ आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंगासोबत स्वतःला जुळवून घेता आले पाहिजे. कारण आयुष्यातील सर्वच दिवस एकसारखे नसतात. कधी दिवस चांगले असतील तर कधी वाईट. आज तुमचा जो जिवलग मित्र आहे तो दहा वर्षानंतर सुद्धा जिवलग राहीलच हे कुणी ठामपणे सांगू शकत नाही. कारण दिवस बदलतात, वेळ बदलते अन वेळेसोबत माणसेही. त्यामुळे आयुष्यात एखाद्याकडून जास्त अपेक्षा न ठेवलेली बरी. कारण आयुष्यातील काही इच्छा, अपेक्षा या कालांतराने त्रासदायक बनतात. मग त्या एखाद्या गोष्टीकडून ठेवलेल्या असो वा एखाद्या नात्यांकडून…

आज सर्वाना स्वतःची एक स्पेस हवी असते. त्यामुळे कोणतेही नातं जोडत असतांना ज्याला-त्याला स्वतःची स्पेस देणे आवश्यक आहे. एखाद्याशी आपले नातं हे जबरदस्त असावं पण जबरदस्तीने असू नये याची खबरदारी प्रत्येकांनी घेतली पाहिले. कारण बऱ्याचदा आपण एखादी व्यक्ती आपली व्हावी म्हणून अति प्रयत्न करतो. जबरदस्तीही करतो, वारंवार त्या व्यक्तीच्या मागे लागतो. पण आपण हे विसरून जातो की समोरच्या व्यक्तीलाही मन आहे, इच्छा आहेत. जर तुमच्यासोबत त्या व्यक्तीला नातं जोडायचे असेल तर ती एक दिवस नक्की येईल त्या त्यासाठी जबरदस्ती करण्याची काहीही गरज नाही.

आपल्याला वाटते की काही माणसं आपल्या आयुष्यात नेहमी असावी. सुखात नसली तरीही चालतील पण दुःखात सावली बनून असावीत. पण त्यापैकी काही कायम सोबत राहतात तर काही अर्ध्यावर सोडून जातात. काही माणसं सोडून गेली म्हणजे आपण चुकीचे आहोत असे होत नाही. कदाचित त्या व्यक्तीची तुमच्याकडून असलेली गरज संपली असेल. त्यामुळे जास्त विचार करत बसायचा नाही. जी सोडून गेली त्यांना आनंदाने निरोप द्यायचा आणि जी माणसं सोबत आहेत त्यांना कायम जपत रहायच. कारण हेच खरे आयुष्य आहे.

शिक्षण घेत असतांना आपले खूप मित्र असतात. सर्वच जिवलग आहेत असे वाटत असते. पण वेळेसोबत खरे चेहरे समोर दिसायला लागतात. शिक्षण संपले की काही मित्र संपर्कात राहतात तर संपर्क क्षेत्राच्या बाहेर. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा एक मर्यादित काळ असतो. काळ संपला की भूमिकाही बदलतात आणि पुढे नवीन प्रयोगासाठी नवीन भूमिका घेऊन जबाबदारी ती पूर्ण करावी लागते. त्यामुळे आपल्या आयुष्यात प्रत्येकाची भूमिका प्रत्येकवेळी एकसारखी राहू शकत नाही हे तितकेच खरे…

फुगा मर्यादेपर्यंत फुगविला तर तो व्यवस्थित राहतो पण जास्त फुगविला तर लगेच फुटतो अगदी नात्याचे सुद्धा असंच. एखाद्याशी नातं जपत असतांना त्या नात्यामध्ये गोडवा, प्रेम, आपुलकी, अपेक्षा, इच्छा तेवढ्याच ठेवायच्या जेवढ्या ते नातं सहन करू शकेल. मर्यादेच्या बाहेर जाऊन नात्यात कोणतीही गोष्ट करू नये. कारण जास्त ताणले की तुटतेच…म्हणून काही गोष्टी पकडून ठेवल्या की गुदमरून जातात. मग त्रास पकडून ठेवणाऱ्याही होतो आणि ज्याला पकडून ठेवलं आहे त्यालाही. त्यामुळे, छोड देते हैं ना!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here