म्हणून तर कौतुक होते…
सत्याचा आरसा,निर्भिडतेचा वारसा!
वाचकहो,
काल पत्रकार दिनानिमित्त आम्ही सडेतोड व निर्भिड संपादकीय अग्रलेख लिहिला.”लोकशाहीला ग्रहण पिवळ्या पित पत्रकारितेचे” या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखाचे सर्वत्र कौतुक झाले.दिवसभर या लेखाचे कौतुक करताना अनेकांनी शुभेच्छा दिल्यात.तर रात्री उशिरा अमरावतीच्या चांदूरबाजार येथील ज्येष्ठ पत्रकार विलास पंचभाई यांनी खास फोन करून अभिनंदन केले व “युवा मराठा”च्या लेखणीचे अगदी तोंडभरून कौतुक करताना आमच्यावर स्तुती सुमने उधळलीत.
आम्ही कालच्या अग्रलेखातून लिहिले होते की, कुठलाही गोम्या सोम्या उठतो आणि वीस पंचवीस हजाराचा मोबाईल फोन घेऊन संपादक बनतो व लग्नपत्रिका सारखे ओळखपत्र वाटत सुटतो आणि आपली एक नवी वसुली टोळी तयार करतो.आणि त्यातूनच लोकशाहीला ग्रहण या अशा भामटया ठरणा-या पिवळ्या पित पत्रकारितेचे लागले आहे.वास्तविक युटूयूबवर चालविल्या जाणा-या या चँनलच्या तथाकथित संपादकांना पत्रकार नियुक्तीचा कुठलाही अधिकार नसतो.हे प्रशासनातल्या अधिका-यांना कसे दिसत नाही.? हा देखील मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.एकंदरीत काय तर “आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय” अशी अवस्था सध्या तरी या बोगस पत्रकारितेमुळे वाढीस लागली आहे.
आम्ही पत्रकारिता क्षेत्रात वयाच्या पंधराव्या वर्षी जेव्हा पहिले पाऊल ठेवले तेव्हाच निर्णय घेतला की, पत्रकारितेचा आरसा हा फक्त सत्याची बाजू मांडण्यासाठीच लेखणीच्या माध्यमातून उभा करायचा, त्यामुळेच गेल्या ४० वर्षाच्या आम्ही केलेल्या पत्रकारीतेमुळे अनेक जवळचे सुध्दा दुखावले गेलेत.काही आमच्यापासून कायमचे दूर निघून गेलेत.तर काहींनी कायमचे शत्रुत्व घेतले.मात्र आम्ही कधीच सत्याचा घेतलेला वसा सोडला नाही.त्यामुळेच आजही आमची एकला चलो रे वाटचाल सुरुच आहे.आम्ही पत्रकारिता करताना किंवा अधिकारी वर्गाकडून काही रसद मिळावी म्हणून कधी आमचा बापही बदलला नाही किंवा फक्त क्षणिक मिळणाऱ्या “भाड”साठी जात देखील चोरली नाही.आमच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत स्वतः ला पत्रकार म्हणून मिरविणारे भामटे बोगस पत्रकार आपला बाप बदलून जात चोरताना सुध्दा आम्ही जवळून बघितले आहेत.मात्र खरा व महत्वाचा प्रश्न हा आहे की, पत्रकारिता या क्षेत्राला काळीमा ठरणा-या बोगस ,भामटया बांडगुळावर कारवाई करण्यास प्रशासन कुचराई का करते? अर्थातच त्यामुळे या भामटया बोगस बहुरुपिया हडवाळीचे फावते व ते पत्रकारिता क्षेत्राला कलंकीत करुन “चौथ्या स्तंभाला” उंदरासारखे पोखरत चालले आहेत एव्हढेच या निमित्ताने! राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक





