राजेंद्र पाटील राऊत
सोलापूर जिल्ह्यातील या दोन युवा सरपंचांची मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर (१ जुन) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सोशल मीडियाद्वारे संवाद साधताना सोलापूर जिल्ह्यातील अंत्रोळी गावच्या सरपंच कोमल करपे व घाटणेच्या ऋतुराज देशमुख या दोन युवा सरपंचांनी आपापले गाव कोरोनामुक्त केल्याने त्यांचे कौतुक करीत या दोघांचा आदर्श महाराष्ट्रातील इतर सरपंचांनी घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावच्या सरपंच कोमल करपे हे अवघ्या २१ वर्षाच्या असून त्यांचे शिक्षण बीएस्सीपर्यंत झाले आहे. अंत्रोळीची लोकसंख्या अवघे सव्वा दोन हजार इतकी असून कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात अंदाजे ७२ जणांना कोरोनाची लागण झाले होते. यात तिघांचा मृत्यू झाला. वेळीच सरपंच करपे यांनी गावातच १० खाटांचे कोविड केअर सेंटर उभे करुन मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सचे प्रभावी अंमलबजावणी केले. तसेच टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटद्वारे अख्खे गाव कोरोनामुक्त केले.
मोहोळ तालुक्यातील घाटणे या गावचे सरपंच ऋतुराज देशमुख यांनीही प्रारंभी टेस्टिंग, ट्रेसिंगद्वारे कोरोना रुग्णांना शोधले. त्यांच्यावर वेळीच गावातच विलगीकरण कक्ष व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचे तपासणी करण्यात आले. तसेच मास्क, सॅनिटायझर, साबण आदींचे वाटप करण्यात आले. यामुळे घाटणे गाव कोरोनामुक्त झाले.
या दोन्ही सरपंचांचा आदर्श आपल्या जिल्ह्यातील इतर गावच्या सरपंचांनी घेतल्यास आपला सोलापूर जिल्हा कोरोनावर नक्कीच मात करेल.