Yuva maratha news
देवळा प्रतिनिधी भिला आहेर तालुका प्रतिनिधी:- उमराणे पासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील रामेश्वर गोशाळेजवळ आज बुधवार (दि.१३) रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहराच्या झाडाला धडकुन शहादा आगाराच्या एका बसला भिषण अपघात झाला. या अपघातात चालकासह सुमारे तिसहुन अधिक प्रवाशी जखमी झाले असुन त्यांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा आगाराची बस क्रमांक (एम.एच.१४ एम.एच.२३१०) ही पुण्याहुन शहादाकडे जात असताना येथुन जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील रामेश्वर गोशाळेजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहरच्या झाडाला धकडुन शेजारीच असलेल्या शेतात ही बस पलटी झाली.अपघात इतका भिषण होता की बसचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. सदर बसमध्ये सुमारे ६० प्रवाशी असल्याची माहिती वाहक जे.व्ही.निकम यांनी दिली असून बसचालक आर.डी.बुवा हे गंभीर जखमी झाले आहेत. तर बसमधील सुमारे तिसहुन अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान बसचा अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते नंदन देवरे, सुनिल सुदाम देवरे तसेच रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी बसमधील जखमींना बाहेर काढत मदत केली. अपघातची माहिती मिळताच मालेगाव आगाराच्या व्यवस्थापक मनिषा देवरे तसेच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांची माहीती घेतली.देवळा पोलीसांकडून अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.






