राजेंद्र पाटील राऊत
महाराजा_सयाजीराव_गायकवाड यांचे दतकविधानदिन २७ मे १८७५
(श्रीमती आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
महाराष्ट्रातील एका खेडेगावातून (कौळाणे, ता.मालेगाव, जि. नाशिक) गेलेला गोपाळ दत्तकविधानाने बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड झाले. या नृपतीने बडोद्यात केलेल्या सुधारणा थक्क करणाऱ्या होत्या. बारा वर्षापर्यंत अशिक्षित असणार्या या गोपाळला दत्तकमाता जमनाबाईसाहेब, दिवाण टी. माधवराव आणि इंग्रजांनी नियुक्त केलेल्या शिक्षक एफ.ए. एच. इलियट यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या अठरा वर्षापर्यंत औपचारिक शिक्षण मिळाले. या शिक्षणामुळे त्यांची दृष्टी विश्वव्यापी बनली. स्वाभिमान जागा झाला. याच शिक्षणाने त्यांना जगातील ज्ञान खुले झाले. राज्यकारभार हाती येताच त्यांना लक्षात आले की, समाजातील अधोगतीला अनिष्ठ वर्णव्यवस्था, अस्पृश्यता कारणीभूत आहे. ती संपायाची असेल तर त्याची सुरूवात आपणच करावी. असे ठरवून त्यांनी सर्वप्रथम राजवाड्यातील पंक्तीभेद दूर केला आणि क्रमाक्रमाणे पंक्तीतील अंतर कमी करत फक्त शाकाहारी आणि मांसाहारी पंक्ती वेगवेगळ्या करण्यापर्यंत सुधारणा केली. तथाकथित धर्ममांर्तडांनी याला विरोध केला; पण महाराजांनी लेखी हुजूर हूकूम काढत त्यावर मात केली. समाजसुधारणेसाठी महाराजांनी अनेक उपाययोजना केल्या. महाराजांच्या या सुधारणेविषयी महात्मा गांधी म्हणतात, “सयाजीराव महाराजांनी हरिजनाबद्दल केलेले कार्य अतुलनीय आणि विस्मृतीत न जाणारे आहे.” महाजांच्या अभ्यासांती लक्षात आले की, राजवाड्यात केले जाणारे धार्मिक कार्यक्रम हे पुराणोत्त पद्धतीने केले जात आहेत. त्याबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत वेदोत्त पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्याबद्दल लिखित आदेश (१८९६) काढला. त्यालाही विरोध झालाच; पण आपल्या बुद्धिचा, मुत्सद्धेगिरीचा वापर करत सदर विरोध मोडून काढला.
समाजात असणारी विषमतेची ही दरी दूर करण्यासाठी कार्य करणाऱ्या समकालीन सर्व कर्त्या पुरुषांना मदत केली. त्यामध्ये महात्मा फुले, महर्षी वि. रा. शिंदे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेकांना खूप आर्थिक मदत केली. महर्षी शिंदे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना तर परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. परदेशातून आल्यानंतरही समाजसुधारणेसाठी मदत केली. फुले दांपत्त्यांनाही अखेरच्या काळात आर्थिक मदत केली. सावित्रीबाई फुले आणि पुत्र यशवंत यांना पेन्शन सुरू केली.
सयाजीराव महाराज सुधारणा करताना सत्तेच्या जोरावर फटाफट कायदे करुन सुधारणा करत नव्हते. तर जनमत आजमावत दीर्घकालीन परिणामकारक सुधारणा करत होते. यामध्ये लग्नाच्या वयाच्या कायद्या प्रातिनिधिक आहे. लग्नाच्या वयाबाबत त्यांनी कायदा करुन घेतला. मात्र, विरोध होताच तो कायदा काही काळ स्थगित ठेवला..जनमत अनुकूल होताच त्याची अमंलबजावणी सुरू केली. विविध समाजाच्या सुधारणा केल्याबद्दल त्यांना “पतितपावन” ही पदवी दिली गेली. त्यांना मिळालेल्या इतर अनेक पदव्यातून या पदवीचा त्यांना फार अभिमान वाटे. समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारे सयाजीराव महाराज श्रेष्ठ समाजसुधारक होते.
त्यांनी केलेले काही समाजसुधाणाविषयक कायदे..पुनर्विवाहाचा कायदा, लग्नविच्छेदाचा कायदा(घटस्फोट), लग्नवयमर्यादा वाढवणे, धार्मिक स्वातंत्र कायदा (१९०१), पुरोहिताचा कायदा(१९१५), वफ्फ कायदा (१९२७), ज्ञातित्रासनिवारक कारदा(१९३३), देवस्थानच्या उत्पादना विनोयोग कायदा, शेतीउपयोगी जनावरांची हत्या बंदी कायदा, फुकट खिचडी व ग्यारमी वाटप बंद करुन गरजू व्यक्तिंना वाटप करणारा कायदा, पुरोहितांना दक्षिणा देण्याचा कायदा, धार्मिक विधीसाठी पुरोहितांना परीक्षा करण्यासंबंधी कायदा, ग्रहणादिवशी सर्व कामकाज बंद ठेवण्याविरुद्धचा कायदा, परदेशगमनाबद्दल प्रायचित्त न घेण्याचा कायदा, जैन आणि मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धा दूर करणारा कायदा असे काही कायदे उदाहरणादाखल सांगता येतील.