राजेंद्र पाटील राऊत
🛑 वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न 🛑
✍️ कोल्हापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
कोल्हापूर :⭕ कोल्हापूर विमानतळावर बदली करण्यात आलेल्या सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याने बुधवारी सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाउल उचलले असल्याचे समजते. या अधिकाऱ्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडूनही उपचार सुरु आहेत. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे.
कोल्हापूर पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरिक्षक असलेले प्रदीप काळे यांनी इचलकरंजी विभागाचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून बुधवारी सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. ते वारणा नदिकाठी बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्याचे समजते. काळे यांची दीड महिन्यापूर्वीच पेठवडगाव पोलिस ठाण्याकडून कोल्हापूर विमानतळ येथे बदली करण्यात आली होती.
गणेशोत्सव काळात नवे पारगाव येथील एका व्यक्तीवर काळे यांनी कारवाई केली होती. ही व्यक्ती इचलकरंजी विभागाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याशी संबंधित होती. त्यामुळे काळे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पेठवडगाव पोलिस ठाण्यातून विमानतळ येथे बदली करण्यात आली होती.
प्रामाणिकपणे काम करत असतानाही वरिष्ठांनी बदली केल्यामुळे काळे नाराज होते. यापूर्वीही त्यांनी याबाबत वरिष्ठांच्या कानावर आपली नाराजी घातली होती. तरीही साईड पोस्टींग दिल्यामुळे काळे यांनी अखेर बुधवारीच सकाळी पोलिस अधिकाऱ्यांच्या एका व्हॉटस अप ग्रुपवर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन स्वीच ऑफ आल्याने मोबाईल लोकेशनवरून त्यांचा शोध घेण्यात आला असता ते सकाळी साडे नउ वाजण्याच्या सुमारास वारणा नदिकाठी बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्याचे समजते.
त्यांना तत्काळ कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता केंद्रात उपचार सुरु असून मानसोपचार तज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे.
पेठ वडगाव येथील नागरिकांनी चांगले काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार केल्याची पोस्ट दोन दिवसापूर्वीच त्यांनी फेसबुक अकाउंटवर केली होती. ⭕