सरपंचपदासाठी ४२ लाखांची बोली, नंदुरबारमधील ‘या’ गावाची का होतेय चर्चा..? लिलावाव्दारे सरपंचपद म्हणजे लोकशाहीची विटंबना!
नंदुरबार,(युवा मराठा न्युज नेटवर्क)
नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी येथील वाघेश्वरी माता देवीवर श्रद्धा आणि एकदा तरी सरपंचपद घरात यावे यासाठी गावातील मंदिराला तब्बल ४२ लाख रुपयांची देणगी देऊन ५ वर्षांसाठी ग्रामपंचायत सांभाळण्याची तयारी येथील प्रदीप वना पाटील यांनी दर्शविली.
अशी’ लागली सरपंचपदाची बोली
खोंडामळी येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील हा लिलाव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. साधारणत: ५ हजार लोकसंख्येच्या या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे.
४ प्रभाग आणि १३ सदस्य असलेल्या या गावात यंदा निवडणूक बिनविरोध करावी, असे काहींचे म्हणणे पडले. त्यासाठी गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीला जो जास्त देणगी देईल त्याच्याकडे ग्रामपंचायत सुपूर्द करावी, असे ठरविण्यात आले.
सर्व पक्षांकडून २५ लाखांपासून ३८लाखांपर्यंत बोली गेली. ग्रामपंचायत एकदा तरी आपल्या ताब्यात यावी आणि सरपंचपद आपल्या घरात यावे यासाठी प्रदीप वना पाटील यांनी इच्छा व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले पाटील यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनीही प्रोत्साहन दिले, आणि ४२लाखांवर त्यांनी बोली लावून ती अंतिम केली. या पैशातून मंदिराची उभारणी केली जाणार आहे.
तसेच, पाटील हे ठरवतील तेच सदस्य बिनविरोध घेतले जाणार आहेत. त्यांना ४ अपत्ये असल्याने ते स्वत: किंवा त्यांच्या पात्र ठरू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलीला सरपंचपदावर विराजमान करावे लागण्याची शक्यता आहे. गावातील काही घटकांनी याला आक्षेप घेतला. परंतु गाव विकासासाठी व गावाच्या एकीसाठी त्यांचाही विरोध मावळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी काय घडामोडी घडतात याकडे आता लक्ष लागून आहे. यानिमिताने एक प्रश्न उभा राहतो तो असा की,या जिल्ह्यातील प्रशासन व निवडणूक आयोगाची पथके नेमकी कोणती जबाबदारी पार पाडीत आहेत.जर लिलावाव्दारेच सरपंचपद मिळणार असेल तर लोकशाहीतल्या निवडणूक प्रणालीला कुठलाही अर्थ उरणार नाही.व देशाचे पंतप्रधान पद देखील मग लिलावाव्दारेच मिळणार का?असाही सवाल या खोंडामळीच्या घटनेतून निर्माण होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖




