• Home
  • 🛑 **मुळशीतील या चौदा गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार**🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 **मुळशीतील या चौदा गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार**🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 **मुळशीतील या चौदा गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार**🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पौड (पुणे) :⭕ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून मुळशी तालुक्याच्या पूर्व भागातील चौदा गावांसाठी मुळशी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक दोन राबविण्याच्या हालचालीला सुरूवात झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारामुळे शासकीय पातळीवर त्याचा आराखडा आखला जात आहे. या योजनेमुळे पूर्व भागातील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावांनी आपला प्रस्ताव पंचायत समितीकडे द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केले आहे.

मुळशी तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. पूर्वीपासूनच गावालगत असलेल्या तलाव, विहिरीतून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. तथापि वाढत्या लोकसंख्येमुळे येथील जनतेला दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ग्रामपंचायतही लोकवस्तीला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यास असमर्थ आहे. त्यामुळे पूर्व भागातील गावांना पाणीपुरवठा करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी यांच्यात पौडला बैठक झाली. त्यात मुळशी प्रादेशिकचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्याबाबत सुळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

मुळशी धरणातील पाण्यावर तालुक्यातील 25 गावे आणि 21 वाड्यांना मुळशी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना गेली अनेक वर्षांपासून कार्यान्वत आहे. या योजनेमुळे मुळा नदीकिनारी असलेल्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून मुळशी प्रादेशिकचा टप्पा क्रमांक दोन ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये बावधन, भूगाव, भुकूम, पिरंगुट, उरवडे, लवळे, सूस, म्हाळुंगे, चांदे, नांदे, मारूंजी, माण, हिंजवडी, मुलखेड या चौदा गावांचा समावेश करण्यात आला आहे.

याबाबत प्राधिकरणच्या उपअभियंता अनिता कुलकर्णी, गटविकास अधिकारी संदीप जठार, महादेव कोंढरे यांच्यासमवेत समाविष्ट गावातील सरपंच, ग्रामसेवकांची झूम अॅपवर ऑनलाईन बैठक झाली. त्यात कुलकर्णी यांनी या योजनेबाबत सविस्तर माहीती दिली. या योजनेतून दरदिवशी प्रत्येक माणसाला 55 लिटर पाणी मिळणार आहे. प्रत्येक घरात पाणी वापराचा मीटरही बसविला जाणार आहे. पहिले वर्षभर प्राधिकरण ही योजना नियंत्रित करणार असून, त्यानंतर ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत केली जाणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांना पाणीपट्टीच्या रूपाने एक हजार लिटरला सतरा रूपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेसाठी समाविष्ट गावांकडून पाण्याची टाकी आणि जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागेची गरज आहे. तसा प्रस्तावही ग्रामपंचायतीकडून मागविण्यात आला आहे. सर्व गावांचे प्रस्ताव आल्यानंतर साधारणपणे तीन महिन्यात त्याचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे.

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ही योजना पूर्वपट्ट्यातील गावांसाठी महत्वाकांक्षी ठरणार आहे. समाविष्ट गावांचाही प्रतिसाद चांगला आहे. प्रस्ताव आल्यानंतर जागांचे सर्वेक्षण करून त्याचे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. ही योजना यशस्वी करून कार्यान्वित करण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे.
– अनिता कुलकर्णी,
उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकारामुळे मुळशी प्रादेशिकच्या दुसऱ्या टप्प्याच्या हालचालीला सुरूवात झाली आहे. या योजनेमुळे नागरिकरण वाढत असलेल्या पूर्व भागातील गावांची पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर  होणार आहे. सद्यस्थितीतील लोकसंख्येचा विचार करून ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी समाविष्ट गावाकंडून जागा आणि प्रस्तावाची गरज आहे.

– महादेव कोंढरे,
अध्यक्ष, मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस …⭕

anews Banner

Leave A Comment