पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात वैयक्तिक सुरक्षा संच, एन-९५ मास्क आणि त्रिस्तरीय मास्क उपलब्ध आहेत. विदर्भातील सर्व रुग्णालयांमध्ये ३१ हजार ९७० वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीई किट) उपलब्ध आहेत, अशी माहिती मेयोच्या अधिष्ठात्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली.
पार्वतीनगर येथील एका तरुणाचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे अनेक डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून रुग्णांवर उपचार करणाऱ्यांनाच सुविधा पुरवण्यात येत असल्याचा दावा सुभाष झंवर यांनी केला होता. त्यावर नोडल अधिकारी रुद्रेश चक्रवर्ती यांनी सांगितले की, पार्वतीनगरचा तरुण हा बारुग्ण विभागात दाखल झाला होता. मृत्यूनंतर तो करोनाबाधित असल्याचे उघड झाले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्या संपर्कात आलेले पाच डॉक्टर, सहा परिचारिका व कर्मचारी विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहेत. विदर्भातील मेडिकल, मेयो, एम्स, अकोला, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात सुरक्षा संच, एन-९५ मास्क व त्रिस्तरीय मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये ३१ हजार ९७० संच असल्याची माहिती मेयोच्या अधिष्ठात्यांच्या वतीने उच्च न्यायालयात सादर करण्यात आली.