आशाताई बच्छाव
मालेगाव | प्रतिनिधी विजय चांदणे
आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे संस्थेच्या तीन भाषेतील वेबसाईटचे उद्या शिवजयंती दिनी अनावरण
मालेगाव येथील आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे संस्थेच्या वतीने उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पावन निमित्ताने संस्थेच्या नव्या तीन भाषेतील अधिकृत वेबसाईटचे अनावरण करण्यात येणार आहे. इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध होणारी ही वेबसाईट नागरिकांसाठी माहितीचा प्रभावी दुवा ठरणार आहे.
संस्थेने सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता डिजिटल युगाच्या गरजा लक्षात घेऊन संस्थेने बहुभाषिक वेबसाईट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संस्थेचे उद्दिष्ट, विविध उपक्रम, सुरू असलेली प्रकल्पे, सदस्यांची माहिती, तसेच संपर्क व देणगीविषयक माहिती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणार आहे.
शिवजयंतीसारख्या प्रेरणादायी दिवशी वेबसाईटचे अनावरण करून संस्थेने डिजिटल परिवर्तनाचा संकल्प व्यक्त केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवा अधिक प्रभावीपणे व पारदर्शकतेने करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे,” असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
ही वेबसाईट केवळ संस्थेची माहिती देणारे माध्यम नसून नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा एक विश्वासार्ह डिजिटल पूल ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे






