Home नांदेड फाईल पूर्ण झाल्याशिवाय घरकुलाचा निधी देऊ नका – सीईओ कावली यांचे निर्देश

फाईल पूर्ण झाल्याशिवाय घरकुलाचा निधी देऊ नका – सीईओ कावली यांचे निर्देश

102

आशाताई बच्छाव

1001646326.jpg

फाईल पूर्ण झाल्याशिवाय घरकुलाचा निधी देऊ नका – सीईओ कावली यांचे निर्देश

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मुखेड -घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांची फाईल पूर्ण झाल्याशिवाय निधी वितरीत करू नये, असा स्पष्ट आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिला आहे. जिओ टॅगिंगही प्रत्यक्ष स्थळी जाऊनच करावे, अशाही सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
गुरुवारी मुखेड पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी कावली यांनी विशेषतः घरकुल योजनांवर भर देत संबंधित कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या.
ग्रामसेवक, घरकुल अभियंता व ऑपरेटर यांनी गावात जाऊन लाभार्थ्यांची फाईल पूर्ण करावी, तसेच संगणकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांवर विभागाचा संपूर्ण भार
घरकुल विभागात शासकीय कर्मचाऱ्यांचा अभाव असून सर्व कामकाज कंत्राटी ऑपरेटरवर अवलंबून आहे. संगणक बंद असल्यामुळे कामात अडथळा निर्माण होत असून ऑपरेटर मोबाईलवरूनच लाभार्थ्यांची माहिती तपासत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नाही.
या स्थितीकडे लक्ष वेधत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या बैठकीस गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे, गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी, विस्तार अधिकारी, सर्व ग्रामसेवक आणि इतर विभागीय कर्मचारी उपस्थित होते.