आशाताई बच्छाव
डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांची महसूलमंत्री बावनकुळे यांच्याशी भेट, राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड येथील गणाचार्य मठाचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुखेड गणाचार्य मठसंस्थान हे हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असून, सध्या येथे भव्य मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे. या विकासकामासाठी ही भेट होती की राजकीय हेतूने, हे स्पष्ट न झाल्याने तर्कवितर्क सुरू आहेत.
डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज हे जनसुराज्य शक्ती पक्षाकडून देगलूर-बिलोली मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. मात्र ऐनवेळी भाजपच्या वरिष्ठांकडून आलेल्या संकेतांमुळे त्यांनी माघार घेतली होती. त्यावेळी भाजपने काय आश्वासन दिले होते हे गुलदस्त्यातच राहिले. मात्र, महाराजांची विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी चळवळीत सक्रिय भूमिका सर्वश्रुत आहे.
भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून मराठवाड्यात डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य हे प्रभावी ठरू शकतात, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या भेटीत भाजपा नेते रामराव मस्कले हेही उपस्थित होते, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले जात आहे.






