आशाताई बच्छाव
विद्यार्थ्यांनी बौद्धिक, शारीरिक क्षमता वाढवून कौशल्य प्राप्त करावे
– राज्यपाल हरिभाऊ बागडे
जालना,दि.2 (जिमाका) : बौध्दीक क्षमतेसाठी पाठांतर, वाचन आणि लिखाण चांगलेच झाले पाहिजे. नकला करुन काही फायदा होत नसते, तर माणूस हा मुळातच अभ्यासू असायला हवा. केवळ शिक्षण न घेता, कौशल्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज झाली आहे. हमखास रोजगार मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी बौद्धिक, शारीरिक क्षमता वाढवून कौशल्य प्राप्त करावे, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
बदनापूर तालुक्यातील आन्वी येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेच्या संत श्री भगवानबाबा आश्रम शाळेच्या वसतिगृह भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, संस्थाध्यक्ष देवेन पटेल, उद्योजक सुनील रायठठ्ठा यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंडित दिनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेची 28 वर्षापासून ही शाळा अविरतपणे सुरु आहे. आन्वी येथील आश्रम शाळेत परिसरातील मुले शिकत असतात. नवीन वसतिगृहाच्या भूमिपुजनानंतर आता एका वर्षाच्या कालावधीत नवीन वसतिगृहाची इमारत बांधून तयार होईल. संत श्री भगवानबाबांच्या संदेशानूसार जीवन जगत असतांना दुसऱ्यांनाही आपण मदत केली पाहिजे, याच उदात्त हेतूने संस्थेची वाटचाल सुरु आहे. विद्यार्थी दशेत चपळता ही महत्वाची आहे. आता मुलींनी अबला न राहता सबला झाले पाहिजे. मुलींनी आजच्या काळात शारीरिक व बौध्दीक क्षमता वाढवावी. पाठ्यपुस्तक व्यतिरिक्त अवांतर पुस्तके वाचुन ज्ञानाचा साठा वाढवावा. तसेच शिक्षकांनीही मुलांना ज्ञानदानाचे काम सुयोग्य करावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.






