आशाताई बच्छाव
सरकार झोपलं का ? पंधरा दिवस उलटले तरी संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोपी मोकाट कसे ?जनतेचा आक्रोश.
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 24/12/2024
बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी मुख्य सूत्रधार आरोपी अजूनही फरार कसे? यामुळे राज्याच्या गृह खात्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य सूत्रधार आरोपी अजूनही गळाला लागले नाहीत आरोपी फरारच आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केवळ बोलघेवडेपणा करत देशमुख कुटुंबीय व राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. परंतु आरोपी का पकडले जात नाहीत यावर मात्र कोणीच सत्ताधारी बोलताना दिसत नाही. या हत्याकांडा बद्दल सर्वच सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी शेपूट खाली घातली असल्याचे दिसत आहे. जनतेच्या प्रश्नाविषयी कोणतीच संवेदनशीलता दिसत नसून मंत्री पदाची खुर्ची मिळविण्यासाठी व मिळालेली खुर्ची वाचविण्यासाठी सर्वच नेते धडपडत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या या वेळ काढुपणामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची पूर्णपणे वाताहात झाली असून राज्याच्या गृह खात्याची लक्तरे वेशीवर टांगली असल्याची प्रचिती राज्यातील जनतेला आली आहे. पुरोगामी व नेहमीच आदर्श वागणुकीची शिकवण देणारा महाराष्ट्र आज बिहार झाला आहे. तरीसुद्धा राजकीय पुढारी मात्र स्वतःची चमडी वाचविण्यासाठी जनतेचा बळी घेत आहेत. राज्यातील सर्व धर्मीय नागरिकांनी संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्दयी हत्तेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. राज्यभर त्यांच्या बद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत असून गुन्हेगारांना फाशीच झाली पाहिजे अशा प्रकारची एकमुखी मागणी सर्व स्तरातून होत आहे. परंतु याविषयी मंत्रीमंडळातील एकही मंत्री याविषयी बोलायला तयार नाही किंवा भुमिका स्पष्ट करायलाही तयार नाही हि बाब अत्यंत निंदनीय व दुर्दैवी आहे.यावरुण सरकारची भूमिका मात्र दुटप्पी असल्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची जशी हत्या झाली होती त्याच्याही पेक्षा वाईट हत्या संतोष देशमुख यांची झाली असल्याची चीड जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. एखाद्या अतिरेक्याच्या हाती जरी एखादा गुन्हेगार दिला असता तरीसुद्धा त्या अतिरेक्यांनी या नराधमांसारखी निर्दयी हत्या केली नसती अशा प्रतिक्रिया अनेक लोकांनी व्यक्त केल्या आहेत. एका आदर्श सरपंचाची निर्घृण हत्या झाली आणि आज पंधरा दिवस उलटून गेले तरी मुख्य सूत्रधार आरोपींचा शोध लागला नाही. यावरून पोलीस यंत्रणा विकलेली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. गुन्हेगारांना सरकारचेच अभय असल्याचे सिद्ध होत आहे. शासनाच्या दुटप्पी व कामचुकार धोरणाच्या विरोधात महाराष्ट्रभर तीव्र संतापाची लाट पाहावयास मिळत असून आता जनतेचा संयम संपला आहे .लवकरच याचा उद्रेक होणार असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून येत आहेत. गुन्हेगारांना जात-पात नसते गुन्हेगार ही एकच त्याची जात असते त्यामुळे लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक झाली नाही तर मात्र जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भुमिका राज्यातील जनतेनी घेतली आहे.
सरकारचे दुटप्पी धोरण राज्यातील जनतेच्या लक्षात आलेले आहे. एकीकडे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये द्यायचे तर दुसरीकडे त्याच लाडक्या बहिणीचे कुंकू पुसण्याचे महापाप या सरकारने केलं असल्याची प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्तेवरून राज्यभर पाहावयास मिळत आहे. म्हणून संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनताच रस्त्यावर उतरणार असल्याची तयारी राज्यातील जनतेने सुरू केली असून लवकरच राज्यातील सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरून संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार असल्याचे बोलले जात आहे.






