आशाताई बच्छाव
पिंप्रीगवळी ते टाकळी घडेकर रस्त्याने होत आहे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल—
रस्ता तात्काळ दुरुस्त करुन विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचवा – मागणी
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
मोताळा :- बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुका हा
आधीच मागासलेला त्यातही मुख्य गरजा म्हणजे वीज रस्ता आणि पाणी आहे पण त्या देखील पूर्ण होत नसल्याने शासनाकडून वारंवार नागरिकांच्या अपेक्षा भंग होतांना दिसत आहे. अशीच एक भीषण वास्तविकता तालुक्यातील पिंप्रीगवळी व टाकळी घडेकर येथील गावकऱ्यांसह चिमुकल्यांनी शासनदरबारी मांडली
आहे.
टाकळी घडेकर हे छोटंस गाव असल्यामुळे तेथील बहुतांश विद्यार्थी पिंप्रीगवळी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिकायला येतात. तसे ते अंतर फक्त ३ कि.मी असून पायी शाळेत येतांना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. टाकळी घडेकर ते सरळ पिंप्रीगवळीला जोडणारा एकमेव मार्ग असून तो रस्ता व्यवस्थित असायला हवा होता पण तो एवढा बिकट झाला आहे की त्यात पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे दोन्ही गावातील नागरीक, शेतकरी विद्यार्थी यांचे हालदेखील डोळ्याने पहावल्या जात नाही अशी बिकट परिस्थिती आहे. वास्तविक हा रस्ता पिंपळगाव देवी, आव्हा, उहा, लिहा, कोल्हीगवळी आदि गावांना जोडणारा दुवा आहे. पण अर्धवट झालेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी कित्येकवेळा शासन दरबारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे केलेली आहे मात्र याकडे कोणीही लक्ष देतांना दिसत नाही आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरु केल्या आहेत. पण रस्ता व्यवस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना चपला, बुट पाठीवर दप्तर घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागत आहे नाहीतर पोफळीवरुन पिंप्रीगवळीला सुमारे दहा ते बारा कि. मी. अंतरावरून यावे लागत आहे त्यामुळे ह्या रस्त्याची गांभीरता लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करावे अशी अपेक्षा दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.






