पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यात विपूल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे. या नैसर्गिकपणे उपलब्ध असणाऱ्या कृषी मालाचे ‘ब्रॅण्डिग’ करून तो शहरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यास मदत होईल. राज्य सरकार त्यासाठी लवकरच ‘बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना’ आणत आहे. गटशेती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.राहुरी येथील म. फुले कृषी विद्यापीठात जागतिक बँक अर्थसाहाय्यीत, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान केंद्राद्वारे सेंद्रिय शेती निविष्ठा वापर, उत्पादन, प्रमाणीकरण आणि विपणन व्यवस्था या विषयावर एक आठवडय़ाचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्याचा समारोप भुसे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा होते. अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे आदी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, शेतकरी उत्पादन घेतो पण ते विकणे अवघड जाते. सध्याच्या टाळेबंदीमध्ये काही शेतकऱ्यांनी स्वत: शेती उत्पादन विक्रीचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले. याच उत्पादनाला ब्रॅण्डिगची जोड दिली तर नक्कीच शेतीमालाला जास्त दर मिळतील. सेंद्रिय शेती मालाचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. सेंद्रिय शेतीचे धोरण ठरवतांना शेतकऱ्यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार केला जाईल.
राज्यात १ हजार ५८५ शेतकरी गट असून त्याद्वारे सुमारे ६५ हजार शेतकरी जोडले गेले आहेत. सध्या राज्यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाते. या गटांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन बळकटीकरण केले जाईल. सेंद्रिय शेतीला भविष्यात मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.टाळेबंदीच्या कालावधीत विद्यापीठाने २२ ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम शेतकरी, विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसाठी आयोजित केले. असा उपक्रम देशात प्रथमच होत आहे. विद्यपीठातही सेंद्रिय शेतीवर संशोधन सुरू आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या असमतोल वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत असून मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीला अधिक महत्त्व प्राप्त होणार असल्याची माहिती कुलगुरू विश्वनाथा यांनी दिली. प्रगतशील शेतकरी विश्वासराव पाटील, अनिल देशमुख, प्रशांत नाईकवाडी, वैभव चव्हाण, रेवती जाधव, मोनिका मोहिते, विवेक माने, उत्तम धिवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणात राज्यातून सुमारे एक हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी स्वागत केले. कास्ट-कासम प्रकल्पाची माहिती डॉ. सुनील गोरंटीवार यांनी दिली. प्रशिक्षणाचा आढावा आयोजक सचिव डॉ. उल्हास सुर्वे यांनी सादर केला.