आशाताई बच्छाव
खेडगाव-बहाळ शिवारात उसाच्या शेतात मिळून आले बिबट्याचे दोन बछडे
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – तालुक्यातील खेडगाव-बहाळ शिवारात उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे मिळून आले.बिबट दिसताच उसतोड मजुरांनी धूम ठोकली. या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
घटनेची माहिती अशी की, तालुक्यातील खेडगाव- बहाळ शिवारात आज सकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास पुंडलीक भिवसन चौधरी यांच्या शेतात उसतोडीचे काम सुरू असतांना उसतोड मजुरांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. या प्रकाराने भयभीत होवून धुम ठोकली.शेतात बिबट्याचे बछडे आढळून आल्याची माहिती शेतमालकाने वन विभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत ती बछडे ताब्यात घेतली. एक महिनापेक्षा कमी वय असलेल्या या बछड्यांपैकी एक मादी तर दुसरा नर आहे.या बछड्यांची आई याच परिसरात असण्याची दाट श्नयता असल्याने वन विभाग सतर्क झाले असून जिथे बछडे आढळून आली तिथे पिंजरा लावण्यात येणार आहे.बछड्यांपासून दुरावलेल्या आई आणि या बछड्यांचे पुनर्मिलनाच्या दृष्टीने वन विभाग प्रयत्नशील आहे.
या बछड्यांची वैद्यकीय अधिकारी डॉ.. संदीप भट यांनी तपासणी केली असता ती सुदृढ असल्याचे सांगण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात कुणी जावू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे.
पोहरे भागात घोड्यावर हल्ला
दरम्यान पोहोरे गावातील आडळसे रस्ता पाटाजवळ एकनाथ महारू माळी यांच्या शेताताजवळ एका घोड्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.






