राजेंद्र पाटील राऊत
कोल्हापूर विभागात इचलकरंजी आगार प्रथम स्थानी
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील इचलकरंजी आगाराला यंदाचा हांगाम अनुकूल ठरला आहे. दिवाळी हंगामात आगाराला 89 लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ही दिवाळी आगाराला लाखोंचे उत्पन्न देऊन गेल्यामुळे एसटी. इचलकरंजी आगारात समाधानाचे वातावरण आहे. काही मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कमी लाभल्याने गतवर्षीच्या तुलनेत 11 लाखांचे उत्पन्न घटले आहे. दिवाळीच्या उत्पन्नात यंदा ही इचलकरंजी आगार कोल्हापूर विभागात अव्वल ठरले आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या एसटी. महामंडळासाठी दिवाळी हंगाम उत्पन्न वाढीचा महत्त्वाचा मार्ग असतो. कोरोनाच्या संकटाच्या झळा सोसत दिवाळी हंगामासाठी इचलकरंजी आगाराने जादा गाड्यांचे नियोजन केले होते.
या हंगामात तब्बल 3 लाख 38 हजार किलोमीटर अंतर एसटीने पार केले. नियमित धावणाऱ्या लांब पल्ल्यावर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळाला. पुणे, सोलापूर, बार्शी, शिर्डी, सांगली, मिरज, कोल्हापूर, कागल, निपाणी या मार्गावर प्रामुख्याने जादा गाड्यांचे नियोजन केले होते. या वर्षी कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने यांची अडचण दिवाळी हंगामाच्या नियोजनात आगाराला जाणवले नाही.
दिवाळीतील प्रवाशांचा प्रतिसादामुळे अनेक मार्गावर विस्कटलेली घडी बसत आहे. औरंगाबाद, रत्नागिरी, नाशिक, चिपळून या लांब पल्ल्यावर लालपरीच्या दैनंदिन फेऱ्या होत आहेत. ग्रामीण भागात धावण्यासाठी उत्सुक असलेली एसटी मात्र अद्याप वेट अँड वॉचची भूमिकेत राहावे लागणार आहे. दिवाळीत जादा गाड्यांचे नियोजन करूनही खेड्यांत प्रतिसाद निरंक राहिला. ग्रामीण भागात एसटीला शाळा, महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .