आशाताई बच्छाव
हिवाळी अधिवेशनात माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची PWD मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे जिल्ह्याच्या विविध मुद्द्यांवर ठोस मागणी
नागपूर,सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यातील पायाभूत विकासकामांना गती मिळावी, लोकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी नागपूर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची विशेष भेट घेतली.
या भेटीदरम्यान डॉ. होळी यांनी जिल्ह्याशी निगडीत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून मंत्री भोसले यांना लिखित निवेदन सादर केले.
रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले
जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, मजबुतीकरण व नवीन रस्त्यांची उभारणी करण्याची मागणी त्यांनी केली.
जीर्ण झालेल्या शासकीय इमारती व जिप शाळांचे पुनर्बांधणीचे मागणी
जिल्ह्यातील शासकीय इमारती जीर्ण झाल्याने नागरिक आणि कर्मचारी धोक्यात आहेत. त्यांच्या नवीनिकरण व डागडुगीचे काम तात्काळ हाती घेणे, तसेच जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे नवीन बांधकाम करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. होळी यांनी निवेदनातून स्पष्ट केले.
कंत्राटदारांच्या थकित देयकांचा मुद्दा ठळकपणे मांडला
जिल्ह्यातील विकासकामे पूर्ण करूनही अनेक कंत्राटदारांची देयके प्रलंबित आहेत. आर्थिक अडचणीतून ते बाहेर पडावेत म्हणून थकित देयके तातडीने मंजूर करून वितरित करावीत, अशी ठाम मागणी त्यांनी मंत्री भोसले यांच्याकडे केली.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सर्व मागण्यांची गंभीर दखल घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीसाठी सकारात्मक आश्वासन दिल्याचे समजते.
डॉ. देवराव होळी यांच्या या भेटीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते, शासकीय इमारती, शिक्षण, जिल्ह्यातील नदी – नाले यावर नवीन पुलिया बांधून व्यवस्था आणि विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






