Home संपादकीय लोकशाहीला ग्रहण पिवळ्या पित्त पत्रकारितेचा गोरखधंदा

लोकशाहीला ग्रहण पिवळ्या पित्त पत्रकारितेचा गोरखधंदा

346

Yuva maratha news

1002145600.jpg

लोकशाहीला ग्रहण पिवळ्या पित्त पत्रकारितेचा गोरखधंदा
वाचकहो,
आज रविवारची मेजवानी एका गंभीर विषयास अनुसरून करून देत आहे.कधी काळी पवित्र म्हणून ओळखली जाणारी पत्रकारिता आज दुर्दैवाने लोकशाहीला ग्रहण लागले की काय? अशी भिती वाटायला लागली आहे.स्वातंत्र्योतर काळात असलेली पत्रकारिता हि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केली गेली.त्यात समर्पण,त्याग व बलिदान देण्याचीही उर्मी त्या काळातील पत्रकारितेत होती.काळ झपाट्याने बदलत जातो.अगदी तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात देखील वेगवेगळे बदल घडत गेले.अगोदर ट्रेडल मशिनवर अक्षरजुळवणी करून छापले जाणारे वृत्तपत्र आता मोठमोठ्या वेब आँफसेट मशिनवर छापले जाऊ लागले.पत्रकारिता करणा-या सच्च्या पत्रकारांचे देखील अगदी तसेच झाले.न्यायासाठी सत्यासाठी लेखनी झिजविणारा पत्रकार आता शोधूनही सापडत नाही.आम्ही पत्रकारितेची सुरुवात सन १९८५-८६ मध्ये केली.त्यावेळच्या पत्रकारितेत आणि आजच्या पत्रकारीतेत जमीन अस्मानचा फरक पडला आहे.त्यावेळी पत्रकारिता करणा-या पत्रकार बांधवांना मान – सन्मानाची वागणूक मिळत होती.गावाकडील प्रत्येक मंडळी पत्रकारांच्या बातमीची आवर्जून वाट बघत बसलेली असायची.एवढी विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा त्यावेळी पत्रकारिता क्षेत्रात होता.पत्रकाराला मान मरातब होता.पत्रकाराच्या शब्दांत आग होती.भ्रष्ट अधिका-यांवर जरब आणि धाक होता.अशीही सत्यासाठी व न्यायासाठी लढणारी पत्रकारिता आता नेमकी कुठे नामशेष झाली तेच कळेनासे झाले.
पत्रकारिता क्षेत्रात बाजारबुनग्याचा सुळसुळाट
मात्र आता अगदी अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत सोशल मीडियावर सुरू झालेली पत्रकारिता आम्हाला नेमकं कोणत्या दिशेला घेऊन चालली आहे याचेच खरे तर आम्हाला भान राहिलेले नाही.आम्ही म्हणत नाहीत की, पत्रकारितेत बदलच नको,बदल हा झालाच पाहिजे.कारण बदल हि काळाची गरज आहे.मात्र बदल होत असताना काही गोष्टी घडायला नकोत त्या दुर्दैवाने बघाव्या लागत आहेत.सध्या गल्लीबोळात पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या उपटसुंभाचे पेव फुटले आहे.अजूनही प्रामाणिकपणे न्यायासाठी व सत्यासाठी लढणारे पत्रकार आहेत.पण ते बोटावर मोजता येतील एवढेच उरले आहेत.बाकी पत्रकारिता क्षेत्र तर ज्यांना स्वतः ला चार ओळींची बातमी लिहिता येत नाही किंवा पत्रकारितेतला ग.म.भ.न.माहित नाही अशाच भामटयांच्या टोळ्यांनी गिळंकृत करून टाकले आहे.येथूनच मग खरे अर्थाने लोकशाहीला या पिवळ्या पित्त पत्रकारितेचे ग्रहण लागले आहे.सध्या तर कुणीही गोम्या सोम्या उठतो पाच पंचवीस हजाराचा स्मार्टफोन घेऊन युटूयूब चँनल सुरू करुन स्वतः ला संपादक पत्रकार म्हणून मिरवितो.या अशा मिरवणाऱ्या टोळ्या आता सर्वत्र कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे खरी सत्यवादी पत्रकारिता बाजूला पडून या बाजारबुनग्यांचा थयथयाट वाढला आहे.त्यामुळे भ्रष्टाचार करणारेही अगदीं निडरपणे पत्रकार (सगळेच नव्हे) आमच्यापुढे काहीच नाहीत या आविर्भावात वागून हजार,पाचशेचे तुकडे या पत्रकारितेच्या नावाला कलंक ठरलेल्या भामटया हडवाळीच्या तोंडावर मारून फेकल्यात की, भ्रष्टाचार करणारेही म्हणतात धन्य पावलो! पत्रकारिता करताना त्याचे काही नियम, आचारसंहिता व पावित्र्य लागू होते पण आता ते पावित्र्य या भामटया हडवाळीच्या टोळ्यांनी पार उध्वस्त करून ठेवले आहे.पत्रकारिता क्षेत्रात जेव्हापासून हि बाजारबुनग्यांची झिपोटया झापोटयाच्या टोळ्या कार्यरत झाल्या तेव्हापासून पवित्र पत्रकारितेत गोरखधंदा शिरला.वाचकहो, आम्ही तर पत्रकारितेच्या नावाखाली वेगवेगळ्या ठिकाणी बहुरुपिया सारखे नाव बदलून किंवा मी अमुक तमूक पेपरचा पत्रकार या नावाखाली वसुल्या करत फिरणारे लोकशाहीला काळीमा फासणारे बाजारबुनगे पत्रकारही बघितलेत.
कुठून आलेत एवढे पत्रकार?
वास्तविक पुर्वी शहराच्या ठिकाणी किंवा तालुक्याला व ग्रामीण भागात पत्रकार बघावयास मिळत होते.मग आता अचानकच पत्रकाराचा एवढा मोठा लोंढा कुठून निर्माण झाला.याचे साधे सरळ सोपे गणित आहे.सोशल मिडीयाचा फायदा घेऊन ज्याला कवडीचीही अक्कल नाही तो देखील संपादक म्हणून मिरवायला लागला आणि गल्लीबोळात पत्रकार म्हणून ओळखपत्र लग्न पत्रिका सारखे वाटायला लागला.तस बघितले तर या सोशल मीडियावर चालविल्या जाणा-या युटूयूब चँनेल्सला शासनाची कुठलीही अधिकृत मान्यता नसते, त्यामुळे साहजिकच त्यांना पत्रकार नियुक्तीचा देखील अधिकार नसतो.मात्र आंधळ दळत अन् कुत्रं पीठ खात या न्यायाने सारेच आलबेल सुरू आहे.प्रत्यक्षात ज्यांच्याकडे भारत सरकारच्या सुचना आणि प्रसारण मंत्रालयाव्दारे नोंदणीकृत असलेले कुठलेही वृत्तपत्र साप्ताहिक, दैनिक, पाक्षिक,मासिक आहे असेच लोक संपादक म्हणून सांगू शकतात आणि पत्रकारांची नेमणूक देखील करू शकतात.त्याशिवाय आपल्याच वृत्तपत्रांच्या नावाने प्रसारित होणाऱ्या वार्ताकनांचे व्हिडीओज अथवा लेखन सोशल मीडियावर युटूयूब, वेबसाईटवर प्रकाशित करु शकतात.मात्र ज्यांना कुठल्याही प्रकारे नैतिक अस्तित्वच नाही ते मात्र दररोज बहुरुपिया सारखे लोकशाहीला ग्रहण लागल्यासारखे पवित्र पत्रकारितेला उध्वस्त करायला निघाले आहेत.आम्ही काही दिवसांपूर्वी एका तालुक्यातील अधिका-याला भेटायला गेलो होतो तर तेथे वेगळेच चित्र बघावयास मिळाले प्रत्येकाने दुकानदारी चालविण्यासाठी स्वतः च्याच नावाचे युटूयुब चँनेल्स सुरू करून संपादक म्हणून मिरविताना आम्ही बघितले.किती घोर विटंबना सुरू आहे या लोकशाहीप्रधान देशात की, अक्षरशः पोट भरण्यासाठी पवित्र पत्रकारितेचा गोरखधंदा करणा-या या भामटया हडवाळीच्या टोळ्यांनी करून ठेवला.खर तर पोलिस प्रशासनाने कठोरात कठोर पाऊल उचलून खरे व बोगस पत्रकार यांची एकदा पडताळणी करायलाच हवी.तरच पारदर्शक व प्रामाणिक पत्रकारिता जीवंत राहिल एव्हढे मात्र खरे!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक
युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनल महाराष्ट्र

Previous articleEpaper: Yuva-Maratha-02-to-8-Nov-2025
Next articleजिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूक लढण्यास इच्छुकांनी अर्ज सादर करा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.