आशाताई बच्छाव
एसपी साहेब.. ‘येथे वाहतो अवैध दारूचा पिसाट समुद्र!’ – बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाणे निष्क्रिय?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-देऊळघाट येथे गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध देशी दारूची उघडपणे विक्री व वाहतूक सुरू असून, या प्रकरणात पोलिस प्रशासनाचे ढिसाळपण स्पष्टपणे समोर येत आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करूनही अजूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे या तस्करीमागे कोणाची तरी छुपी मेहरबानी असल्याचा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे एसपी साहेब आपण याकडे गांभीर्याने लक्ष देत कारवाई करावी, व कायदा व सुव्यवस्था राखावी अशी मागणी केली जात आहे. गजानन पन्हाळे नावाचा इसम बुलढाणा येथील परवानाधारक दारू दुकानातून देशी दारू घेऊन दुचाकीवरून भरधाव वेगाने देऊळघाटमध्ये वाहतूक करत असतो. त्याच्या या वर्तणुकीमुळे गावात अनेकदा शाब्दिक चकमकी आणि हातघाईच्या घटना घडल्या आहेत. गावातील शांतता धोक्यात आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही प्रशासन मात्र नेहमीच मौन धारण करत असल्याचे दिसून येते. अशा प्रकारची उघडपणे सुरू असलेली अवैध विक्री आणि वाहतूक ही केवळ स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेचा आणि निष्क्रियतेचा जिवंत पुरावा आहे. यावरून ग्रामस्थांनी सवाल उपस्थित केला आहे “सदर व्यक्तीवर कारवाई होत नसेल तर ती कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? पोलिसांची पकड यांच्यावर का नाही?” या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा ग्रामस्थ आंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. या प्रकारामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे.






