आशाताई बच्छाव
बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी कृती समिती भविष्यात मोठा संघर्ष करेल. – गुणवंत नागटिळे
श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने तिरंगा रॅली काढत केला निर्धार कामगारांच्या कल्याणाचा.
कोल्हापूर. (अविनाश शेलार यांजकडून)
महाराष्ट्र राज्य बांधकाम श्रमिक कामगार कृती समितीच्या वतीने बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आज राजर्षी शाहू स्मारक भवन येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. या निर्धार मेळाव्याच्या अगोदर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील भारतीय नागरिक व शहीद जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी व या हल्ल्याचे प्रत्युत्तर देणाऱ्या सैनिकांचे कौतुक करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. ही तिरंगा रॅली शाहू समाधी स्थळ ते शाहू स्मारक भवन अशी काढण्यात आली. या तिरंगा रॅलीमध्ये हातात तिरंगी झेंडे घेऊन व विविधतेचे फेटे बांधून हजारोंच्या बांधकाम कामगार बांधवांचा मोठा सहभाग होता.
या रॅलीचे रूपांतर ऐतिहासिक राजश्री शाहू स्मारकच्या मुख्य सभागृहात मेळाव्यामध्ये झालं. या मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी बांधकाम कामगारांच्या लढ्यासाठी 28 संघटनांची झालेली ही कृती समिती अविरतपणे कार्य करणार आहे व कार्य करत आहे. असा निर्धारही पदाधिकाऱ्यांनी केला. कृती समितीचे व निर्धार मेळाव्याचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कामगार कष्टकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. कृती समितीमध्ये सर्व बांधकाम कामगारांनी सहभागी व्हावे. हा सहभाग नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम करेल. बांधकाम कामगारांच्या सुविधांचे पोर्टल शासनाने बंद केलं होतं पण ते सुरू करण्यासाठी संघटनेतील आम्ही पाच पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि ते पोर्टल अद्ययावत सुरू करण्यासाठी शासनाला भाग पाडलं. ही निर्धारित असणारी कामगारांची ताकद आहे. आणि ती ताकद कायमस्वरूपी टिकली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया. पुढील असंख्य प्रलंबित प्रश्न आहे त्यासाठी रास्ता रोको करून व अनेक आंदोलनांचा मार्ग अवलंब करुन कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आम्ही रात्रंदिवस संघर्ष करू हे सांगितलं.
या निर्धार मेळाव्यामध्ये 1) पहिली ते दहावीपर्यंत कामगाराच्या मुलास टॅब व दहावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलाना लॅपटॉप मोफत द्यावा 2 ) बांधकाम कामगार मंडळामध्ये कृती समितीतील कामगार प्रतिनिधी घ्यावा.3) घरकुल योजना प्रलंबित केलेले आहे त्याचा लवकरात लवकर निपटारा करावा 4) कामगाराच्या उपचारासाठी नोंदणी ऍक्टिव्हची अट रद्द करावी 5) मयत बांधकाम कामगाराच्या योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करावे.6) जिल्हास्तरीय बांधकाम कामगारांची समन्वय समितीने व्हावी यासहित अन्य ठराव व मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. या निर्धार मेळाव्यात कार्याध्यक्ष अमोल कुंभार, सचिव तानाजी तावडे, उपाध्यक्ष संजय धुमाळ, संजय गुदगे, सर्जेराव कांबळे, एकनाथ गुरव, युवराज पाटील, मच्छिंद्र कांबळे यासहित अन्य प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बंद झालेले पोर्टल सुरू करावे यासाठी उपोषणास बसलेल्या गुणवंत नागटिळे , संजय सुतार ,संजय धुमाळ, अमोल कुंभार, रज्जाक अत्तार यांचा ज्येष्ठ कामगार प्रतिनिधींच्या वतीने सन्मान करण्यात आला. या संमेलनामध्ये पहलगाम हल्ल्यातील नागरिकांना व ऑपरेशन सिंदूर मधील शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली व कार्यक्रमाच्या शेवटी हात उंचावून न्याय हक्कांचा संघर्ष करणारा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक आकाराम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन वैभव प्रधान यांनी केले तर आभार प्रकाश पोवार यांनी मानले.






