आशाताई बच्छाव
वंजारवाडी परिसराला वादळाचा तडाखा अहिल्या नगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
सोनई आणि
परिसरास सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. वंजारवाडी ता. नेवासे व चेडगाव ता. राहुरी या दोन गावांत चक्रीवादळाने दहा मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. प्रचंड वादळाने साठहून अधिक विजेचे खांब, दोनशेहून अधिक झाडे, तसेच अनेक दुकाने व घरांचे पत्रे उडून गेले आहेत. अगोदरच संकटात सापडलेले शेतपिकांची वादळी पावसाने पुरती वाट लागली आहे.
परिसरात सलग चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यातच काल रात्री नऊनंतर विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली.
वंजारवाडी व चेडगाव शिवारास वादळाने जबर तडाखा दिला. त्यात विजेचे खांब व मोठी झाडे उन्मळून पडली, तर सोनई-राहुरी रस्त्यावरील वीसहून अधिक रसवंती व व्यावसायिकांचे पत्र्याचे शेड व कापडी अच्छादनाचे नुकसान झाले. कल्याणम्
मंगल कार्यालयाचे मोठे शेड रस्त्यावर येऊन पडल्याने राहुरी रस्ता काहीकाळ बंद होता. बाजरी, चारापिके, भुईमूग व भाजीपाला पिके पावसाच्या पाण्यात बुडाली.
घटनेची माहिती समजताच आमदार विठ्ठल लंघे, तहसीलदार डॉ. संजय बिरादार, कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी व इतर सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजला आहे, तर अनेकांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कामगार तलाठी नितीन घाटेशाही यांनी तत्काळ पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.






