आशाताई बच्छाव
महावितरणने चालवलेला विजेचा लपंडाव केव्हा थांबणार?सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांचा सवाल
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि.२१ मार्च २०२५ परळी शहरात गेल्या महिन्याभरापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, यामुळे नागरिक व व्यावसायिक हैराण झाले आहेत. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी केला आहे.
परळी शहरातील नागरिक व व्यावसायिकांना नियमित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “वीज गेल्यानंतर दोन-दोन तास परत येत नाही. आली तरी किती वेळ टिकेल, याचा काहीही भरवसा नाही. या अनियमित वीजपुरवठ्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. विशेषतः आईस्क्रीम, हॉटेल व इतर विजेवर अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.” तसेच, नागरिकांकडून भरमसाठ वीजबिले आकारली जात असताना, त्यांना २४ तास वीजपुरवठा मिळत नाही, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. महावितरणचे वीज वितरण वेळापत्रक संपूर्ण कोलमडले असून, वीज केव्हा जाईल आणि केव्हा येईल, याचा काहीही ठावठिकाणा नाही.
“महावितरणने त्वरित हा विजेचा लपंडाव थांबवावा, अन्यथा मित्र मंडळाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही अँड. मनोज संकाये यांनी दिला आहे.
नागरिकांची मागणी – वीजपुरवठा सुरळीत करावा
परळीतील नागरिकांनी महावितरणच्या या अनागोंदी कारभाराचा निषेध नोंदवत, विजेचे वेळापत्रक निश्चित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, आगामी काळात याविरोधात मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.