Yuva maratha news
नाशिक शिक्षक मतदारसंघात निकालापूर्वीच झळकले उमेदवारांच्या विजयाचे बॅनर
सतीश सावंत-विभागीय प्रतिनिधी : क.स.मा.दे.
नाशिक : विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक या चार मतदार संघांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. काल २६ जून रोजी मतदान झाले असून, १ जुलै रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महायुतीच्याच दोन्ही मित्रपक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिल्याने नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक चर्चेत राहिली.
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी २१ उमेदवार रिंगणात होते. तर, मुख्य लढत ही शिंदे गटाचे किशोर दराडे, ठाकरे गटाचे संदीप गुळवे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात होती. निवडणुकीच्या एक दिवस आधीच येवल्यात पैशांचे पाकीटं सापडली होती. तर, मतदानाच्या दिवशीही नाशिकमधील एका मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करतानाचा प्रकार उघडकीस आला होता. शिंदे गटाकडून हे पैसे वाटप झाल्याचे आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आले होते. दरम्यान, १ जुलैला निकाल लागणार असून, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी निकालाच्या ३ दिवस आधीच त्यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत.
निकालाआधीच विजयाचे बॅनर
१ जुलैला नाशिक शिक्षक मतदार संघांचा निकाला जाहीर होणार असून, त्यापूर्वीच कोपरगावमध्ये अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर विवेक कोल्हे यांच्या समर्थकाने लावले असून, यावर “मी विवेक स्नेहलता बिपिन दादा कोल्हे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की”, असा उल्लेख आहे. दरम्यान, निकालापूर्वीच लवण्यात आलेल्या हा बॅनर सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत असून, १ जुलैला गुलाल कोण उधळणार..? विवेक कोल्हे जिंकणार..? की समर्थकांना बॅनर काढावे लागणार..? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.