Home नाशिक इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या मैदानात थेट मुख्यमंत्र्यांची एन्ट्री

इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या मैदानात थेट मुख्यमंत्र्यांची एन्ट्री

287

आशाताई बच्छाव

1000487466.jpg

इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या मैदानात थेट मुख्यमंत्र्यांची एन्ट्री

प्रतिनिधी-सतीश सावंत

नाशिक शिक्षक मतदार संघाच्या मैदानात आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उतरावे लागले. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकींची रणधुमाळी सुरू असून यात नाशिक शिक्षक मतदारसंघात रोज नवनवीन ट्विस्ट दिसत आहेत. महायुतीकडून नाशिक शिक्षक मतदार संघाची जागा शिंदे गटाच्या वाट्याला असली तरीही या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडला असून अजित पवार गटानेही आपला स्वतंत्र उमेदवार दिलेला आहे. यामुळे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांची वाट खडतर असून त्यांच्यासमोर अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे आव्हान आहे. एकूणच ही निवडणूक महायुतीच्या उमेदवारासाठी कठीण दिसत असून नाशिकमध्ये आता लोकसभेनंतर आता विधान परिषद निवडणुकीच्या जागेवर पुन्हा एकदा शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान नाशिक शिक्षक मतदार संघाच्या मैदानात आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उतरले असून शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी आज मुख्यमंत्री नाशिक शिर्डी आणि जळगाव मध्ये महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत.

*इतिहासात पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या जागेसाठी मुख्यमंत्री मैदानात*

विधान परिषद निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्यातरी मतदारसंघाची धुरा स्वतः मुख्यमंत्र्यांना सावरावी लागत आहे. राज्यातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीला जर अशा विधानपरिषद निवडणुकीसाठी सभा घ्याव्या लागत आहेत तर मग स्थानिक नेते पदाधिकारी काय करताय ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान आता थेट मुख्यमंत्र्यांनीच नाशिक शिक्षक मतदार संघाच्या या लढतीत एन्ट्री केल्याने नाशिकची निवडणूक ही प्रतिष्ठेची होणार आहे.
नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचीही नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रभारी पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आधीच नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि आता गिरीश महाजन हे जंग जंग पछाडत असतानाच आता थेट मुख्यमंत्र्यांच्या एन्ट्रीने नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.