Home सामाजिक माझा भारत महान

माझा भारत महान

313

आशाताई बच्छाव

IMG_20240225_072850.jpg

माझा भारत महान

भारत विविधतेने नटलेला देश आहे.येथील सांस्कृतिक इतिहास, भाषेतील विविधता, प्रादेशिक सीमा देशाला एकत्र बांधून आहेत.भारताची संस्कृती आणि परंपरा प्राचीन काळापासून टिकून आहेत.येथील अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पाया अतिशय मजबूत आहे.याचबरोबर आधुनिकता व वैज्ञानिकता यांचा पुरस्कारही भारताने केला आहे.आपला भारत देश आध्यात्मिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक आधारावर उभा आहे.आपल्याला देशाबद्दल वाटणारा आदर आणि आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या वृध्दीसाठी, देशासाठी केलेली कृती म्हणजे खरी देशभक्ती.
आपला देश जेव्हा पारतंत्र्यात होता त्यावेळी अनेक लोकांच्या साथीने देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले होते.त्यांची देशभक्तीच आपल्याला पारतंत्र्यातून बाहेर काढू शकली.सध्या अशाच देशभक्तीची राष्ट्राला गरज आहे.भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे.आपल्या संस्कृतीची जपणूक करून उन्नती साधणे हे भारताचे वैशिष्ट्य ठरले आहे.भक्ती देवाची असो वा देशाची, आपल्या भारतीयांसाठी भक्ती हा जीवनाचा एक मार्ग आहे.
भौगोलिक रचनेचा विचार करताना देशाची दक्षिण-पूर्व आणि दक्षिण-पश्चिम सीमा अथांग महासागराने व्यापली आहे.उत्तरेला हिमालय पर्वत अडीग असा उभा आहे.कित्येक वर्षांची शेतीची परंपरा भारताला लाभलेली आहे.प्रादेशिक भाषा देखील वेगवेगळ्या आहेत, पोशाख देखील वेगवेगळे आहेत, खानपान देखील वेगवेगळे आहे.गंगा, यमुना, गोदावरी,कावेरी, यमुना, ब्रह्मपुत्रा यांसारख्या नद्या येथे हजारो वर्षांपासून अविरत वाहत आहेत.भारतावर अनेकदा परदेशी आक्रमणे झाली.भारत देश अनेकवेळा लुटल्या गेला.पण या मातीतील वीरपुत्रांनी प्रत्येकवेळी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाचे रक्षण केले आहे.भक्ती,तंत्र,ध्यान,योग अशा विविध मानवी उन्नतीच्या कला भारतात पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत.त्यामुळे भौतिक सुखाच्या पलीकडे जाऊन वैश्विक अस्तित्व आणि आनंद याचा शोध घेण्यात भारतीय लोक यशस्वी झाले.भारतातील वैज्ञानिकांनी चंद्र मोहीम,मंगळ मोहीम यशस्वी करून दाखवली आहे.भारतातील शास्त्रज्ञ संपूर्ण जगभरात स्थित आहेत.देश हा तेथील व्यक्तींनी मोठा होत असतो.प्रत्येकाला देशाबद्दल असणा-या जवाबदारीची जाणीव असणं गरजेचं आहे.यासाठी लहानपणापासून मनात देशाबद्दल आत्मियता निर्माण करायला हवी.त्यातूनच नव्या पिढीच्या मनात आपल्या देशाबद्दल देशभक्तीची भावना जागृत होईल.आपण आपल्या देशासाठी सामूहिक स्तरावर काही कार्य करू शकतो.देशभक्ती फक्त स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच न दाखवता ती आपल्या कृतीतून नेहमी दिसायला हवी.
आपला देश प्रगतीकडे वाटचाल करतो आहे.अशा प्रगत देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व देशवासियांनी अंतर्गत कलह मिटवून देशाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे.भारतातील समाज आणि संस्कृती शारीरिक सुखाच्या पलीकडे जाऊन अध्यात्मिक उन्नती करून घेणारी आहे.आपले योगा,ध्यान, आयुर्वेद सर्व देशांचे लक्ष वेधून घेत आहेत.प्रत्येक क्षेत्रात भारताने आज नाव कमावले आहे.भारतातील अनेक रूढी परंपरा वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील सत्य आहेत याची पुष्टी जगभरातील वैज्ञानिक देत आहेत.भारत देश पुढील काही वर्षांत विश्वगुरू म्हणून उदयास येईल यात तिळमात्र शंका नाही

लैलेशा भुरे
नागपूर