आशाताई बच्छाव
राष्ट्रीय सेवा योजनेतून श्रमसंस्काराची बीजे पेरली जातात -हिरवे नेवासा,(कारभारी गव्हाणे)-राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार करणारी विद्यापीठे असतात, राष्ट्रीय सेवा योजनेेतून विद्यार्थ्यांच्या मनात श्रमसंस्काराची बीज पेरणी होते. असे प्रतिपादन नेवासा तालुका कृषी अधिकारी मा. धनंजय हिरवे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई, अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पानेगाव ता. नेवासा येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर सामाजिक भान निर्माण करणे गरजेचे असते, त्यातूनच त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो आणि हे व्यासपीठ श्रमसंस्कार शिबिरातून उपलब्ध होते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पानेगावच्या सरपंच सौ. निकिता भोसले या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिबीराच्या माध्यमातुन गावच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात एन.एस.एस. गीताने व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांनी विद्यार्थी स्वयंसेवकांना गावात भरीव काम करण्याचे आवाहन करत असतानाच विद्यार्थी दशेत मिळालेली श्रमाची शिदोरी आयुष्यभर पुरते असे सांगितले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. बाळासाहेब खेडकर यांनी कार्यक्रमांचे प्रास्तविक व पाहुण्यांचे स्वागत केले. या प्रसंगी पानेगावचे उपसरपंच मा. दत्तात्रय घोलप, श्री. रघुनाथ जंगले, श्री. भाऊसाहेब काकडे, श्री. लक्ष्मण जंगले, श्री. नानासाहेब जंगले, श्री. सुनिल चिंधे व ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील डॉ. विठ्ठलराव दरंदले, डॉ. अविनाश साळवे, डॉ. राजेश वाघ, डॉ. सोपान नजन, प्रा. बाळासाहेब शिंदे, प्रा. महेश जंगले, डॉ.सिध्दार्थ रणयेवले, डॉ.नामदेव घुले, प्रा.अमोल दरंदले, प्रा.राहुल निपुंगे, प्रा.महेश ताके, प्रा.कावेरी ढोकणे, प्रा.अश्विनी दरंदले, प्रा.प्रतीक्षा कंक, श्री. सोमनाथ शिंदे, श्री.सोपान दरंदले व मोठया संख्येने विद्यार्थी स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर पादर व कु. इशिका आल्हट यांनी केले तर प्रा.शरद औटी यांनी उपस्थितांचे आभार मानले.






