Home युवा मराठा विशेष चांदोरी येथील कुटुंब वत्सल बय आजी- रखमाबाई खालकर

चांदोरी येथील कुटुंब वत्सल बय आजी- रखमाबाई खालकर

317
0

आशाताई बच्छाव

IMG-20230916-WA0073.jpg

चांदोरी येथील कुटुंब वत्सल बय आजी- रखमाबाई खालकर

खालकर कुटुंबीयांचा आधारस्तंभ असणारी माझी आजी म्हणजे रखमाबाई शिवराम खालकर यांचे प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्ताने तिच्याबद्दल असलेल्या मनातील आठवणींना थोडा उजाळा….
आमची आजी म्हणजे पूर्वाश्रमीची शांताबाई विठोबा जाधव गोंडेगाव (मुखेड) येथील माहेर विठोबा कोंडाजी जाधव यांचे सर्वात पहिले अपत्य. तीन बहिणी व एक भाऊ. त्या काळच्या रूढी परंपरेनुसार बालपणीच चांदोरी येथील शिवराम सखाराम खालकर यांच्याशी वयाच्या 12 व्या वर्षीच विवाह झाला. विवाहानंतर चार मुले व तीन मुली ,सासू-सासरे, दिर-जावा सगळे भरलेले कुटुंब अशा घरात आजी नांदत होती सर्व कामे पुढे होऊन करत होती पुढे काही काळानंतर कुटुंब विभक्त झाल्यानंतर आजोबा सतत आजारी असल्याने आजीने काबाडकष्ट करून आपल्या मुलांची लग्न तिने केली .
ती कुठल्याही शाळेत गेली नव्हती तरी स्वतः सायखेडा येथे बाजाराला जाऊन घरचे धान्य व भाजीपाला न्यायची व येणाऱ्या पैशात घरात लागणाऱ्या वस्तू किराणा आणायची एक वस्तू कमी परंतु न विसरता नातवंडांना मात्र भरपूर खाऊ आणायची .तिने खुप चिकाटीने संसार केला त्याचे उदाहरण म्हणजे पूर्वी फक्त सहा एकर जमीन होती तर आज 30 एकर जमीन आहे त्यासाठी तिने प्रसंगी स्वतःची दागिने तारण म्हणून ठेवले. म्हणूनच तिच्याबद्दल म्हणावेसे वाटते …”दारिद्र्याच्या संसाराचे नंदनवनही करते आजी चिल्यापिलांना प्रकाश देण्या दिव्यासारखी छळते आजी..
जरी न शिकली चार अक्षरे तरी घरातच तान्हुल्याचे विद्यापिठ ही संस्काराचे होऊनिया वावरते आजी….
व कुटुंबावरील असे संस्कार केले की जे माया आपुलकी स्वाभिमान प्रेम ,सहकार्याची भावना या जोरावर तिने चारही मुलांचे कुटुंब आजही एकत्रित बांधून ठेवले. आहे घरी येणाऱ्या प्रत्येकाला ती जेवण केल्याशिवाय जाऊ देत नव्हती नाही जेवण केले तरी चहाचा आग्रह माञ करायची.मला तिच्यातली आवडलेली एक गोष्ट म्हणजे तिने मुलगा व मुलगी हा कधीही भेद केला नाही .तिला आम्ही सात नाती होतो. त्यांच्यावर तिचा खूप जीव होता.तिला प्रवासाची खूप आवड असल्यामुळे तिने चार धाम यात्रा ही पूर्ण केली होती. पंढरपूरला ती पायी गेली होती. एकदा तर आम्हा सर्व नातींना रेल्वेने शेगावला घेऊन गेली तसेच पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर येथेही घेऊन गेली होती.तिला सर्व कुटुंबाची सतत काळजी असायची. घरातील कोणीही व्यक्ती बाहेर गेला तर ती सतत त्याची वाट बघायची आणि जोपर्यंत ती व्यक्ती घरात येत नाही तोपर्यंत तिचा जीव टांगणीला लागलेला असायचा. ती व्यक्ती घरात येत नाही तोपर्यंत ती रात्री सुद्धा जागी असायची व ते आल्यानंतरच झोपायची.आजवर तिने केलेल्या संस्कारामुळे एक मुलीचा मुलगा व एक मुलाचा मुलगा डॉक्टर आहे तसेच दोन नाती शिक्षिका ,नातु व्यापारी व इंजिनियर , नोकरीला आहे असे सर्व नातु व नाती,नात जावई उच्चशिक्षित आहेत.
आता मी माहेरी गेल्यानंतर तिची खूप उणीव भासते कारण ती नेहमी ओट्यावर बसून अंगणात खेळत असलेला पतवडांकडे म्हणजेच नातींच्या मुला मुलींकडे सतत लक्ष ठेवायची व आम्ही सर्व नाती तिच्या अवतीभोवतीच असायचो. अजून दोन दिवस तरी रहा असा आग्रह करायची. माझ्या नातींना काही गोडधोड करुन खाऊ घाला असे तिच्या सुनांना सांगायची. असे गोकुळाप्रमाणे भरलेलं घर ती नसल्यामुळे सुने सुने वाटते.
हिंदोळ्यावर आठवणींच्या अजून माझी दिसते आजी
ती गेली पण हिरमुसलेल्या काळजात या वसते आजी
हंबरडा गाईचा येतो केविलवाणा गोठ्यामधुनी
अथांग डोळ्यातील तिच्या त्या करुणेत दिसते आजी… पहाट वेळी जात्यावरती होते ओवी बहिणाईची
संध्या समयी होऊन पणती तो तुळशी पुढे ती बसते आजी …
तिच्या स्मृतीने होता व्याकुळ दाटुन येते डोळा पाणी
परी आसवे पुसावयाला माझ्याजवळी नसते आजी….
कधी न भरून निघणारी मायेची पोकळी………….म्हणजे आमची बय आजी!

शब्दांकन —-
श्रीमती सुवर्णा किसन खालकर / जाधव
स्वामी विवेकानंद विद्यालय कुंदेवाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here