• Home
  • जिल्ह्यात कृषी व महिला उद्योजकता अभियान राबवणार – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जिल्ह्यात कृषी व महिला उद्योजकता अभियान राबवणार – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

आशाताई बच्छाव

IMG-20221111-WA0053.jpg

जिल्ह्यात कृषी व महिला उद्योजकता अभियान राबवणार
– जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

▪️बचत गट, शेतकऱ्यांना विद्यापीठा मार्फत मिळणार व्यवस्थापनाचे धडे

▪️मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष उपक्रम
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड  :- नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात एक वैविध्यपूर्ण कल्पकता व कलात्मकता दडलेली आहे. किनवट सारख्या आदिवासी भागात कोलाम व इतर जमातीच्या महिला बांबुपासून विविध वस्तुंची निर्मिती करतात. काही तालुक्यात सेंद्रीय व नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करून त्याची गुणवत्तापूर्ण उत्पादन करणारे असंख्य बचतगट जिल्ह्यात कार्यरत आहेत. या बचत गटांना बाजारपेठेशी व विशेषत: पॅकेजिंगसह ऑनलाईन विक्रीचे तंत्रज्ञान पोहचविण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात कृषी व महिला उद्योजकता अभियान हा विशेष उपक्रम राबवू असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

निजामाच्या तावडीतून मराठवाड्याला मुक्त होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. अर्थात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या विशेष उपक्रमाला दिशा मिळण्यासाठी विद्यापिठात याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील महिला बचतगट, शेतकरी उत्पादक, लघु उद्योजक यांच्या व्यावसायिक कल्पनांना आकार देऊन त्याचे स्टार्टअप पर्यंत रुपांतर व्हावे यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीस कुलगुरु डॉ. उध्दव भोसले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी सु. धा. थोरात, मनपा उपायुक्त भारत राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. राजाराम माने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यात महिला बचत गट खूप मोठया प्रमाणात कार्यरत आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात आता बचत गट आणि लघु उद्योगासह व्यवसायाबाबत मोठ्याप्रमाणात जागृती झाली आहे. लोकांना आता खरी गरज त्यांच्या कल्पनांना व्यवसायिक आकार देण्यासह स्टार्टअप पर्यंत आणण्याची आहे. एकाबाजुला शासनाच्या विविध योजनाअंतर्गत असलेला निधी व स्टार्टअपचे प्रशिक्षण देणारे विद्यापिठातील केंद्र यांचा समन्वय साधून नव्या लघु उद्योगांना आम्ही भक्कम आकार देऊ असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण काम करणारे विद्यार्थी/विद्यार्थीनी, बचतगटातील महिला व उद्योजक यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन व सहाय्य केले जाते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात यासाठी इनक्युब सेंटर साकारले असून यामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन मोठ्या प्रमाणात हाती घेऊ असे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मुली व महिलांसाठी एनयु एल एम, एमएस आर एलएम, माविम, बँक तसेच कौशल्य विकास यांचे सहकार्याने नाविण्यपूर्ण प्रशिक्षण याअंतर्गत दिले जाईल. यातून त्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळेल. यासाठी विशेष प्रशिक्षणावर भर देण्यासह इन्क्युबेशन सेंटर अधिक गतीने कार्यरत होणार आहे. या सेंटरमध्ये विद्यार्थी/विद्यार्थीनीना, बचतगटांतील महिला व उद्योजक यांना स्टार्ट-अप, मार्केटींग व विक्री सॉफ्ट स्किलबाबतचे प्रशिक्षण देण्याबाबत बैठकीत व्यापक चर्चा झाली. महिलांना अधिक रोजगार व स्वयंरोजगार मिळावा असे प्रशिक्षण कौशल्य विकास कार्यकारी समितीमार्फत प्रस्तावित करावे असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

यावेळी कौशल्य विकास रोजगार व उद्योजगकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाची इतर माहिती सादर केली.

anews Banner

Leave A Comment