Home Breaking News रेशनचे स्वस्त धान्य सोडा; अन्यथा बाजारभावाने वसुली धनिकांना पुरवठा विभागाचा इशारा

रेशनचे स्वस्त धान्य सोडा; अन्यथा बाजारभावाने वसुली धनिकांना पुरवठा विभागाचा इशारा

57
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220821-WA0076.jpg

रेशनचे स्वस्त धान्य सोडा;
अन्यथा बाजारभावाने वसुली
धनिकांना पुरवठा विभागाचा इशारा
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)

सोलापूर, दि.18- आर्थिक सधन असलेल्या धनिकांनी अन्नसुरक्षा योजनेतून बाहेर पडून रेशन दुकानातून मिळणारे स्वस्तातील धान्यावरील हक्क सोडावा, यासाठी पुरवठा विभागाने मोहीम सुरू केली असून जे सधन शिधापत्रिकाधारक स्वत:हून पुढे येत नाहीत, अशांकडून आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजारभावाने वसुली करण्याबरोबरच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा पुरवठा विभागातील अधिकारी व निरीक्षकांनी दिला आहे.
पुरवठा विभागाचे पुणे विभागीय उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी सधन शिधापत्रिकाधारकांनी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ सोडण्याकरता आवाहन केले आहे. त्यानुसार ही मोहीम तीव्र करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांनी शहरातील परिमंडळ अ, ब, क, ड या चारही विभागातील संबधित पुरवठा अधिकारी व रेशन दुकानदारांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. शिधापत्रिकाधारकांनी स्वत:हून या योजनेतून बाहेर पडण्यासाठी मोहीम चालू झाली आहे. यासंदर्भातील अर्ज रेशन दुकानदारांकडे उपलब्ध आहेत. जे सधन कार्डधारक स्वत:हून लाभ सोडत नाहीत, अशा कार्डधारकांची यादी दुकानदारांनी प्रशासनास द्यावी. योग्य पडताळणीनंतर त्या कार्डधारकांचे धान्य बंद केले जाईल. प्रतिसाद न देणार्‍या ग्राहकांकडून उचललेल्या धान्याचे पैसे बाजार भावाने वसूल करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.
दरम्यान, तालुकास्तरावर शिधापत्रिकाधारकांकडून या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शहरातील सधन लाभार्थी मात्र दूरच असून या मोहिमेकडे त्यांनी पाठ फिरविली आहे. ते स्वत:हून पुढे न आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पुरवठा निरीक्षकांनी सांगितले.
या बैठकीस परिमंडळ अधिकारी संजय निरगुडकर, नितिन वाघ, अनिल गवळी, सुरेश गायकवाड, पुरवठा निरीक्षक सुयोग देशमुख, राजेश येमपुरे, अनिल शहापुरे, लक्ष्मण पवार, अंकुशे, निठुरे यांच्यासह रेशन दुकानदार उपस्थित होते. चौकट..
…तर रेशन दुकानदार जबाबदार नाही
कारवाई टाळण्यासाठी सधन शिधापत्रिकाधारकांनी स्वत:हून पुढे येऊन रेशन दुकानदारांकडे धान्य नको असल्याबाबतचा अर्ज भरून द्यावा. सधन असतानाही धान्य उचलत असल्याचे निदर्शनास आल्यास व त्यानंतर कारवाई झाल्यास त्यास रेशन दुकानदार जबाबदार राहणार नाहीत, असे स्पष्टीकरण स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नितीन पेंटर यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here